
जपान संघाविरुद्ध विजय आवश्यक
नवी दिल्ली : आशिया कप महिला हॉकी स्पर्धेत भारतीय संघाच्या शानदार सुरुवातीला धक्का बसला आहे. आतापर्यंत अपराजित असलेल्या भारतीय महिला हॉकी संघाला पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागला. यजमान चीनने दमदार कामगिरी करत भारताला ४-१ ने पराभूत केले.
या पराभवामुळे स्पर्धेत भारताचा मार्ग थोडा कठीण होऊ शकतो, तर संघाच्या आत्मविश्वासालाही मोठे आव्हान निर्माण होऊ शकते. चिनी खेळाडूंच्या वेग, रणनीती आणि अचूक पासिंग समोर भारतीय बचाव कमकुवत झाला आणि त्यामुळे हा सामना एकतर्फी झाला.
भारताकडून मुमताज खानने ३९ व्या मिनिटाला एकमेव गोल केला तर चीनकडून झोउ मीरोंग (चौथा आणि ५६ वा मिनिट), चेन यांग (३१ वा मिनिट) आणि टॅन जिनझुआंग (४९ वा मिनिट) यांनी गोल केले. आता भारतीय संघाला अंतिम फेरी गाठण्यासाठी जपान संघाविरुद्ध विजय नोंदवणे आवश्यक बनले आहे.
भारतीय संघ पूल टप्प्यात अपराजित राहिला. त्यांनी थायलंड आणि सिंगापूरला हरवले तर जपानशी बरोबरी साधली. सुपर ४ टप्प्यातील पहिल्या सामन्यात त्यांनी कोरियाला ४-२ असे हरवले. सुपर ४ मधील अव्वल दोन संघ १४ सप्टेंबर रोजी अंतिम फेरीत खेळतील.
आशिया कपमधील विजेत्या संघाला बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये होणाऱ्या २०२६ महिला विश्वचषकात थेट प्रवेश मिळेल. भारतीय संघ संधींचा फायदा घेण्यात अपयशी ठरला आणि तीन पेनल्टी कॉर्नरपैकी एकाहीमधून गोल करू शकला नाही. पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी आक्रमण करून संधी निर्माण केल्या. चौथ्या मिनिटाला मीरोंगने रिबाउंडवर गोल केल्याने चीन आघाडी घेण्यात यशस्वी झाला. दहाव्या मिनिटाला भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला पण चिनी बचावपटूंनी गोल होऊ दिला नाही.