
अबू धाबी : बांगलादेश संघाने हाँगकाँग चायना संघावर सात विकेट राखून विजय साकारत आशिया कप मोहिमेला शानदार विजयाने सुरुवात केली. या विजयात कर्णधार लिटन दासची ५९ अर्धशतकी खेळी मोलाची ठरली.
हाँगकाँग संघाला १४३ धावांवर रोखल्यानंतर बांगलादेश संघाने विजयी लक्ष्य ..षटकांत गाठले. परवेझ हुसेन इमॉन (१९) व तन्झिद हसन तमीम (१४) या सलामी जोडीने २४ धावांची सलामी दिली. दोन बाद ४७ अशा स्थितीतून कर्णधार लिटन दास याने शानदार अर्धशतक (५९) ठोकून संघाच्या विजयाचा पाया भक्कमपणे रचला. तौहिद ह्रदयॉय (नाबाद ३५) याने सुरेख फलंदाजी केली. दास समवेत त्याने तिसऱ्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. बांगलादेशने १७.४ षटकात तीन बाद १४४ धावा फटकावत विजय साकारला. अतीक इक्बालने दोन गडी बाद केले.
हाँगकाँगचा डाव
हाँगकाँगसाठी निझाकत खानने सर्वात मोठी खेळी खेळली. त्याने ४० चेंडूत ४२ धावा केल्या. कर्णधार यासिम मुर्तझानेही १९ चेंडूत २८ धावांचे योगदान दिले. याशिवाय झीशान अलीने ३० धावा केल्या. बांगलादेशकडून गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. तस्किन अहमद, तंजीम हसन साकिब आणि रिशाद हुसेन यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. मुस्तफिजूर रहमानला यश मिळाले नाही पण त्याने किफायतशीर गोलंदाजी केली. हाँगकाँगची सुरुवात खूपच खराब झाली आणि संघाला पहिला धक्का फक्त सात धावांवर बसला. त्यानंतर, विकेट पडण्याची प्रक्रिया अधूनमधून सुरू राहिली. शेवटच्या षटकात तस्किन अहमदने एजाज खानला बाद केले आणि डाव १४३ धावांवर थांबवला. कल्हण छल्लू चार धावांवर आणि एहसान खान दोन धावांवर नाबाद राहिले.