नाशिक ः महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करीता फेलोशिप इन इंटिग्रेटेड फॅमिली मेडिसिन अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ झाला असून ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १४ सप्टेंबरपर्यंत आहे.
विद्यापीठाच्या फेलोशिप अभ्यासक्रमाविषयी माहिती देताना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, प्राथमिक आरोग्यसेवेचे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने फेलोशिप इन इंटिग्रेटेड फॅमिली मेडिसिन या फेलोशिप अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. सर्वसमावेशक आणि सुलभ आरोग्य सेवेकरीता हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला असून शहरी आणि ग्रामीण भागात मूलभूत कौशल्यपूर्ण आरोग्यसेवा देण्यासाठी मा. कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांच्या संकल्पनेतून फेलोशिप अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी सुसंगत मल्टी डिसिल्पिनरी एज्युकेशन आणि भारतीय ज्ञानप्रणाली यांना प्राधान्य देणारा हा अभ्यासक्रम आहे. वैद्यकीय व आयुर्वेद विद्याशाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण असलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात असे त्यांनी सांगितले.
या फेलोशिप अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना सर्वसामान्य आजारांवर उपचार, स्त्रीरोग, बालरोग, प्राथमिक आपत्कालीन व्यवस्थापन, मानसिक आरोग्य, इत्यादी विभागांमध्ये प्राथमिक तपासणी, स्क्रीनिंग आणि उपचारांचे मूलभूत कौशल्ये देण्यात येणार आहे. स्थानिक स्तरावरच उपचार देणे शक्य होणार आहे आणि मोठ्या रुग्णालयांवरील ताण कमी करण्यासाठी रुग्णाला उच्चस्तरीय उपचार देण्यासाठी हा फेलोशिप अभ्यासक्रम महत्वपूर्ण ठरणार आहे.
आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्राचा योग्य सल्ला व उपचार देणे हा या फेलोशिपचा गाभा आहे. फेलोशिपमधील प्रशिक्षण वैद्याला रुग्णाच्या प्रकृती, जीवनशैली, आजाराचा कालावधी आणि भावनिक स्थिती यांचा अभ्यासक्रमात समावेश आहे. आयुर्वेदिक प्रतिबंधक सल्ला जसे आहार, योग, दिनचर्या यांचे योग्य संतुलन महत्वपूर्ण आहे. दीर्घकालीन जीवनशैली जन्य आजारात आयुर्वेदिक उपाय उपयुक्त ठरतात त्यासाठी पंचकर्म, योग, आहार सुधारणा प्रभावी असतात. हृदयविकार, पक्षाघात, संसर्गजन्य रोग या आजारांमध्ये आधुनिक वैद्यकशास्त्राची तातडीची उपचार प्रणाली आवश्यक असते.
याप्रसंगी एमपीजीआयच्या डीन डॉ मृणाल पाटील यांनी सांगितले की, आधुनिक वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्र पोस्ट ग्रॅज्युएट वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था नाशिक येथे आधुनिक वैद्यकशास्त्रासाठी आणि आयुर्वेद विषयांसाठी दोन संलग्नित आयुर्वेद महाविद्यालयांमध्ये तसेच आयुर्वेद सेवा संघ आयुर्वेद महाविद्यालय आणि श्री सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाईल. एकूण पंधरा मॉड्यूल्स असलेल्या या एक वर्षाच्या फेलोशिपमध्ये हे फेलोज आधुनिक वैद्यकशास्त्र आणि आयुर्वेद रुग्णालयांतील सर्व विभागांमध्ये अंर्तरुग्ण व बाहयरुग्ण विभाग, आपत्कालीन विभाग, कौशल्य प्रयोगशाळा पंचकर्म विभाग या ठिकाणी अनुभव आधारित शिक्षण घेतील असे त्यांनी सांगितले.
या फेलोशिप अभ्यासक्रमासंदर्भात विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ www.muhs.ac.in वर माहिती उपलब्ध आहे तसेच इच्छुकांनी 0253-2539206 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. विद्यापीठाचा फेलोशिप इन इंटिग्रेटेड फॅमिली मेडिसिन अभ्यासक्रमासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात येत आहे.