
पुणे ः पुणे येथील प्रा रामकृष्ण मोरे महाविद्यालयात सृजनरंग सांस्कृतिक व साहित्यिक जिल्हास्तरीय (पुणे ग्रामीण) स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे राजेंद्र घाडगे (उपाध्यक्ष),ॲड संदीप कदम (मानद सचिव), ॲड मोहनराव देशमुख (खजिनदार), एल एम पवार (उपसचिव), एम एम जाधव (सहसचिव) तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख डॉ सदानंद भोसले यांचे मार्गदर्शन व सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मान्यवरांनी स्पर्धकांना त्यांच्यातील कलागुणांना अविष्कृत करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व प्रा रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त) आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सृजनरंग सांस्कृतिक व साहित्यिक जिल्हास्तरीय (पुणे ग्रामीण) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अभय खंडागळे हे होते. त्यांनी स्पर्धक विद्यार्थ्यांना आपल्यातील कलागुणांची जाणीव करून देत ते कसे जोपासले पाहिजे हे समजावून सांगितले. तसेच आपल्याला मिळालेले हे व्यासपीठ म्हणजे भविष्यकाळातील संधी आहे. त्यामुळे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या या कार्यक्रमाचा आपण आनंद घ्यावा असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ सारिका मोहोळ यांनी केले. या स्पर्धेत एकूण ५०२ विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा आपणास आस्वाद घेता येईल. या स्पर्धेत निबंध, वक्तृत्व, काव्यवाचन, पथनाट्य, पोवाडा गायन, भित्तीचित्रे इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले याची माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अभिजित कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांनी कलागुणांचे सादरीकरण करताना आपल्यातील सर्जनशील विचार व प्रतिभा यांची सांगड घालावी. तसेच भारतीय परंपरा व तत्कालीन काळातील सामाजिक जाणिवांचे नवनवीन प्रयोग सादर करण्यात करावेत. ज्यामुळे आपल्या साहित्य व संस्कृतीचे जतन व संवर्धन होऊन आपली कला पुढील पिढीकडे सुपूर्द करता येईल असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमात प्राचार्य अभय खंडागळे, उपप्राचार्य एच बी सोनवणे व मधुकर राठोड, कार्यालयीन प्रबंधक संजय झेंडे, अभिजित कुलकर्णी, स्वाती काळे, परीक्षक, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ अभय खंडागळे यांच्या मार्गदर्शनाने महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर सेवक तसेच राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ एम एम बागुल, डॉ सारिका मोहोळ, डॉ पूनम वाणी व डॉ वैभव साळवे व विद्यार्थी इत्यादी सर्वांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अमोल बिबे यांनी केले व डॉ वैभव साळवे यांनी आभार मानले.