 
            धुळे ः श्री विलेपार्ले केळवणी मंडळ मुंबई, संचलित तांडे शिरपूर येथील मुकेश आर पटेल निवासी सीबीएसई शाळेत जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे आयोजन धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व मुकेश आर पटेल शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. या स्पर्धेत शाळेच्या आठ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळवले. या आठही विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावरील बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
जिल्ह्यातील तब्बल १२५ खेळाडूंनी उत्साहाने या स्पर्धेत सहभाग नोंदवला. उद्घाटन समारंभाला तालुका क्रीडा अधिकारी स्वप्नील बोधे, मुकेश आर पटेल निवासी सीबीएसई शाळेच्या प्राचार्या मंजू सिंह तसेच सर्व क्रीडा शिक्षक व पंच उपस्थित होते.
जिल्हा क्रीडा संघटनेमार्फत आयोजित या स्पर्धेत १४ वर्षाखालील गटात शिव देसले, प्रज्ञान द्विवेदी व दुर्गेश पाटील यांनी सुवर्णपदक पटकावले. १७ वर्षाखालील मुलींच्या गटात प्रायुषी वसावे, राधा पाटील, देवांशी पहाडे व आर्या पाडवीने सुवर्णपदक पटकावले तर दीपल नगराळेने रौप्य पदक मिळवले. १९ वर्षाखालील मुलींच्या गटात सेजल पाटीलने सुवर्ण तर अरायना ग्रेशियसने रौप्यपदक पटकावले.
या खेळाडूंना क्रीडा समन्वयक व प्रशिक्षक धीरज पाटील यांनी मार्गदर्शन केले. खेळाडूंच्या या यशाबद्दल एसव्हीकेएम संस्थेचे अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, संस्थेचे सहअध्यक्ष भुपेशभाई पटेल, शिरपूरच्या नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, व्यवस्थापन समिती सदस्य राजगोपाल भंडारी, एसव्हीकेएम स्कूल डायरेक्टर गिरीजा मोहन, शाळेच्या प्राचार्या मंजु सिंह, एसव्हीकेएम स्पोर्ट्स डायरेक्टर किरण आंचन, असिस्टंट स्पोर्ट्स डायरेक्टर डॉ आशिष शुक्ला यांनी कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



