
राहुल सोनवणे, अली बाकोदा यांची जल्लोषात मिरवणूक
छत्रपती संभाजीनगर ः सिद्धार्थ उद्यान जलतरण तलावावर झालेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावून शाळेसह गावाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ढोरेगाव येथील विद्यार्थी राहुल सोनवणे, क्रीडा शिक्षक अली बाकोदा यांच्या सन्मानार्थ गावात भव्य जल्लोष मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
ढोरेगाव येथील राज्य रस्त्यावर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ढोरेगावपर्यंत निघालेल्या मिरवणुकीत ढोल-ताशांचा गजर,लेझीम खेळत ‘विजयी वीर पुढे चला’ अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. विजेत्याचे स्वागत हार, पुष्पगुच्छ व पेढ्यांच्या गोडीतून करण्यात आले.
सत्कार व कौतुकाचा वर्षाव
पंचक्रोशीतील ज्येष्ठ मंडळी, सरपंच अयुब पटेल, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष खलील पटेल, चेअरमन काकासाहेब पठाडे, केंद्र प्रमुख दत्तात्रय दाणेकर, राजेश हिवाळे, अशोक कांबळे, मधुकर शिंदे, नयुम शेख, चांद शेख, गणपत शिंदे, सुदाम मोरे, एकनाथ पठाडे, प्रभाकर शिंदे, मकसूद शेख, नसीर शेख, बाबुराव पठाडे, वैजनाथ कांबळे यांच्यासह ग्रामस्थ, युवक, सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते तसेच शाळकरी मुले मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते. शिक्षकांसह विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. गावकऱ्यांनी या यशाचा अभिमान व्यक्त करत “हा विजय संपूर्ण गावाचा विजय आहे” असे सांगितले.

खेळाडूंना प्रेरणा
या ऐतिहासिक यशामुळे गावातील लहान मुलांमध्ये जलतरण खेळाबद्दल विशेष आकर्षण निर्माण झाले असून भविष्यात आणखी खेळाडू जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर घवघवीत यश संपादन करतील, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
शाळेतही सन्मान
केंद्रप्रमुख दत्तात्रय दाणेकर, राजेश हिवाळे, शिक्षक राजश्री वानखडे, शंकर राऊत, बसवराज उदे, रीना लोहार, वंदना निधोनकर, नीलिमा कुलकर्णी, मुग्धा निमसे, मनोज मस्के, सचिन पाटसकर, शामीर शेख, अली बाकोदा यांच्या उपस्थितीत राहुल सोनवणे व चांदणी माळी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी गंगापूरचे गटशिक्षणाधिकारी अरविंद कापसे यांनी भ्रमणध्वनीवर राहुल सोनवणे व शिक्षकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या पुढील स्पर्धेतही तो नक्कीच यश मिळवेल असा विश्वास या प्रसंगी केंद्र प्रमुख दत्तात्रय दाणेकर यांनी व्यक्त केला आहे.