
राज्य अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेला शानदार प्रारंभ
सोलापूर ः राज्य अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेत सोलापूर मुलींच्या संघाने अमरावतीवर २३-१० असा मोठा विजय नोंदवला. इतर सामन्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अकोला, चंद्रपूर या संघांनीही मोठे विजय साकारत आगेकूच केली आहे.
केगाव येथील सिंहगड इन्स्टिट्युटच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत अन्वी साबळे (७ गुण) व गार्गी देशपांडे (४) यांच्या बहारदार खेळीमुळे सोलापूर संघाने मध्यंतरास १४-११ अशी निर्णायक आघाडी घेतली होती. अमरावती संघाकडून पूर्वी धूतकवडे (८ गुण) हिचे प्रयत्न अपुरे पडले. अन्य एका सामन्यात नागपूर संघाने जळगावचा ४९-५ असा धुव्वा उडवित दणदणीत विजय मिळविला. इंद्रायणी मुळे ही त्यांच्या विजयाची मानकरी ठरली. इंद्रायणीने संघास ११ गुण मिळवून दिले.
मुलांच्या गटात चंद्रपूर, अकोला व छत्रपती संभाजीनगरने शानदार विजय मिळविले. चंद्रपूरने सांगलीस २७-३ तर अकोलाने रत्नागिरीस ३२-१२ असे नमविले. चंद्रपूरकडून चिराग कुमारे तर अकोलाकडून यश व अंश हे त्यांच्या विजयाचे शिल्पकार ठरले. अन्य एका सामन्यात शिवम सानप व ओजस यांच्या अष्टपैलू खेळामुळे छत्रपती संभाजीनगरने नांदेडला ३१-६ असे हरविले.