
दुबई ः भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुचर्चित सामना रविवारी रंगणार आहे. आशिया कप स्पर्धेत दोन्ही संघांनी सलामीचे सामने दणदणीत फरकाने जिंकले आहेत. या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याला रोहित शर्मा-महेंद्रसिंग धोनी यांच्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची संधी मिळणार आहे. भारताने हा सामना जिंकला दर सूर्या विशेष क्लबमध्ये सामील होईल.
पाकिस्तानविरुद्ध टी २० क्रिकेटमध्ये फक्त दोन भारतीय कर्णधार विजय नोंदवू शकले आहेत. यामध्ये महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा यांचा समावेश आहे. आता जर भारतीय संघ १४ सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकला, तर कर्णधार सूर्या पाकिस्तानविरुद्ध टी २० क्रिकेटमध्ये विजय मिळवणारा तिसरा भारतीय बनेल. यासाठी त्याला फक्त विजयाची आवश्यकता आहे.
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानविरुद्ध ७ टी २० सामने आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ३ टी २० सामने जिंकले आहेत. त्याच वेळी, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानविरुद्ध फक्त एक टी २० आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला होता आणि त्यामध्ये भारताला १० गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता.
१८ टी २० सामन्यात विजय
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण २३ सामने खेळले आहेत, त्यापैकी त्यांनी १८ जिंकले आहेत आणि फक्त चार सामने गमावले आहेत, तर एक सामना बरोबरीत सुटला आहे. तो गोलंदाजीत चांगले बदल करतो आणि डीआरएस घेण्यातही तज्ज्ञ बनला आहे.