
सचिव फारुक शेख यांची मागणी
जळगाव ः जळगाव जिल्ह्यातील सर्वात लोकप्रिय व सर्वाधिक खेळाडू असलेला फुटबॉल खेळ खासदार महोत्सवातून वगळून शासनाने पुन्हा एकदा खेळाडूंवर अन्याय केला आहे.
गेल्या तीन वर्षांच्या नोंदीप्रमाणे दरवर्षी मुले ४५६४ व मुली २६१० असे एकूण ७१७४ खेळाडू फुटबॉल खेळात सहभागी होतात, तरीसुद्धा फुटबॉलचा सहभाग नाकारून केवळ ५०० खेळाडूही नसलेल्या खेळांचा समावेश करण्यात आला आहे. हा प्रकार स्पष्ट राजकारण व क्रीडाप्रेमींचा अपमान असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
फुटबॉल खेळाडूंचा ठराव
जिल्ह्यातील फुटबॉल खेळणाऱ्या लहान मुलांनी जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव फारुक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ठराव केला आहे की फुटबॉलचा तातडीने खासदार महोत्सवात समावेश करावा, केंद्रीय क्रीडा राज्य मंत्री रक्षा खडसे यांनी खऱ्या खेळाडूंवर व लोकप्रिय खेळावर अन्याय दूर करावा.
फुटबॉलची ताकद दाबता येणार नाही
जळगाव जिल्ह्यातील हजारो खेळाडूंनी घाम गाळून लोकप्रिय केलेला खेळ खासदार महोत्सवातून वगळणे म्हणजे जळगाव जिल्ह्याच्या क्रीडा परंपरेवर प्रहार आहे. शासनाने त्वरित दखल घेऊन फुटबॉलचा सहभाग निश्चित करावा, अन्यथा मोठ्या आंदोलनाला तोंड द्यावे लागेल असा इशारा संघटनेचे सचिव फारुक शेख यांनी दिला आहे.