
नवी दिल्ली ः भारतीय पुरुष बॅडमिंटन जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी हाँगकाँग ओप स्पर्धेत विजेतेपदाच्या सामन्यासाठी आपले स्थान निश्चित केले आहे. यावेळी स्पर्धेत सात्विक-चिरागची सातत्यपूर्ण कामगिरी दिसून आली आणि ती त्यांनी उपांत्य फेरीतही कायम ठेवली. उपांत्य फेरीत त्यांचा सामना चेन चेंग कुआन आणि लिन बिंग-वेई या चायनीज तैपेई जोडीशी झाला. सात्विक आणि चिराग यांनी हा सामना एकतर्फी जिंकला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.
सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत चायनीज तैपेई जोडीविरुद्ध २१-१७ असा उपांत्य फेरीचा पहिला सेट जिंकून १-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये, सात्विक-चिराग यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आणि २१-१५ च्या फरकाने विजय मिळवला आणि चायनीज तैपेईचा २-० असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.
भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने आतापर्यंत हाँगकाँग ओपनच्या एकेरीत चमकदार कामगिरी केली आहे. त्याने आयुष शेट्टीचा २१-१६, १७-२१ आणि २१-१३ अशा फरकाने पराभव करून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. आता लक्ष्यचा सामना सेमीफायनलमध्ये तैवानच्या चाऊ टिएन चेनशी होईल, जो सध्या जागतिक क्रमवारीत ९ व्या क्रमांकाचा खेळाडू आहे. लक्ष्य सेन सध्या जागतिक क्रमवारीत २० व्या स्थानावर आहे.