
मुंबई ः आशिया कप क्रिकेट स्पर्धेत रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यावरुन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी भारत-पाक सामन्यावरुन जोरदार बॅटिंग केली. ते म्हणाले की, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे घाव अजूनही भरलेले नाहीत. या घटनेनंतर आम्हाला वाटले की पाकिस्तानचे दोन-तीन तुकडे होतील. त्यावेळी ऑपरेशन सिंदूर झाले. दरवेळी पाकिस्तानकडून हल्ला होतो, आपले सैनिक शौर्याने लढतात, काही जण शहीद होतात. पण तेव्हा डोनाल्ड ट्रम्प सांगतो की, त्यांनी युद्ध थांबवलं. एकदा नीरज चोप्रा यांनी पाकिस्तानी प्रशिक्षक घेतला होता, तेव्हा त्या प्रशिक्षकाला देशद्रोही ठरवलं गेलं. आणि आता त्याच पाकिस्तानसोबत आपण क्रिकेट खेळतोय? जो पाकिस्तान सातत्याने दहशतवाद पसरवत आहे, त्याच्याशी आपण संबंध ठेवतो? मग आपण तिथे शिष्टमंडळ पाठवलं होतं का?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अजूनही संधी आहे, त्यांनी या सामन्यावर बहिष्कार घालावा आणि देशाला योग्य संदेश द्यावा,” असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
जय शाहांवर निशाणा
जय शाह सामना पाहायला जातील, तर त्यांना देशद्रोही म्हणायचं का? भाजप इतकी निर्लज्ज झाली आहे की, सामना सुरू असताना जाहिरातीत ‘सिंदूर’ दाखवायला देखील कमी पडणार नाही,” असा टोलाही ठाकरे यांनी लगावला. “उद्या होणाऱ्या आंदोलनाचं शीर्षक आहे ‘माझं कुंकू, माझा देश’. कारण क्रिकेटच्या सामन्यात विकेट गेली तर दुसऱ्या सामन्यात संधी मिळते. पण जवान शहीद झाले, तर त्यांच्या कुटुंबांचे आयुष्य उजाडून जातं. ही व्याख्या भाजपला कळत नाही,” अशी बोचरी टीका त्यांनी केली.
मियाँदाद भेटीवर भाष्य
उद्धव ठाकरे यांनी पाकिस्तानचा माजी खेळाडू जावेद मियाँदाद आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यातील भेटीवरही भाष्य केले आहे. “जर मातोश्रीवर जावेद मियाँदादच्या येण्यावरुन भाजप टीका करत असेल तर मला विचारायचं आहे की, त्यांना बाळासाहेबांच्या हिंदुत्वावर शंका घ्यायची का? भाजपची तेवढी लायकी आहे का? असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला.