
डी ११ टी २० लीग क्रिकेट ः हिंदुराव देशमुख, ऋषिकेश तरडे सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः डी स्पोर्ट्स प्रेझेंट्स डी ११ टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यात इथिकल क्रिकेट अकादमी संघाने असरार ११ संघावर सहा विकेट राखून सहज विजय संपादन केला. दुसऱया सामन्यात यंग ११ संघाने एमजीएम क्रिकेट अकादमीचा पाच विकेट राखून पराभव केला. या लढतींमध्ये हिंदुराव देशमुख आणि ऋषिकेश तरडे यांनी सामनावीर पुरस्कार संपादन केला.

रुफीट क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. असरार ११ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत १८ षटकात नऊ बाद १२५ धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करताना इथिकल क्रिकेट अकादमीने १५.१ षटकात चार बाद १२८ धावा फटकावत सहा विकेट राखून सामना जिंकला.
या सामन्यात हिंदुराव देशमुख याने शानदार आक्रमक अर्धशतक ठोकले. त्याने ४८ चेंडूत ११ चौकार व ३ उत्तुंग षटकार मारुन ८० धावांची दमदार खेळी साकारली. विकास वाघमारे याने ३४ चेंडूत ४६ धावा फटकावल्या. त्याने सहा चौकार व एक षटकार मारला. शाहरुख याने २७ धावांची वेगवान खेळी केली. त्याने एक चौकार व एक षटकार मारला. गोलंदाजीत हिंदुराव देशमुख याने १८ धावांत तीन विकेट घेऊन अष्टपैलू कामगिरी बजावली. या शानदार कामगिरीमुळे त्याला सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला. राजेश शिंदे याने १८ धावांत तीन तर विकास वाघमारे याने २४ धावांत दोन गडी बाद केले.

एमजीएम अकादमी पराभूत
एमजीएम क्रिकेट अकादमी आणि यंग ११ यांच्यातील दुसरा सामना कमी धावसंख्येचा आणि एकतर्फी झाला. एमजीएम अकादमीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत १४ षटकात सर्वबाद ८० धावा काढल्या. यंग ११ संघाने आक्रमक फलंदाजी करत १२.३ षटकात पाच बाद ८४ धावा फटकावत पाच विकेटने सामना जिंकला. ऋषिकेश तरडे हा सामनावीर ठरला.
कमी धावसंख्येच्या या सामन्यात मधूर पटेल याने २९ धावा काढल्या. त्याने दोन चौकार व दोन षटकार मारले. ऋषिकेश तरडे याने चार चौकारांसह २१ धावा फटकावल्या. समर्थ पुरी याने १५ धावांचे योगदान दिले. गोलंदाजीत अमित पाठक याने २६ धावांत तीन विकेट घेऊन सामना गाजवला. संदीप सहानी याने ४ धावांत दोन गडी टिपले. वेदांत काटकर याने ६ धावांत दोन बळी घेतले.