
साऊथ झोन सर्वबाद ४२६, अंकित शर्माचे शतक हुकले
बंगळुरू ः अंकित शर्मा (९९), आंद्रे सिद्धार्थ (नाबाद ८४) व समरन रविचंद्रन (६७) यांच्या दमदार फलंदाजीच्या बळावर साऊथ झोन संघाने डावाचा पराभव टाळला. मात्र, साऊथ झोन संघाचा दुसरा डाव ४२६ धावांवर संपुष्टात आला. दुलीप ट्रॉफी जिंकण्यासाठी सेंट्रल झोन संघाला केवळ ६५ धावांची गरज आहे.
या सामन्यात साऊथ झोन संघाचा पहिला डाव ६३ षटकात अवघ्या १४९ धावांत गडगडला. त्यामुळे साऊथ झोनला दबावात खेळावे लागत आहे. दुसरीकडे सेंट्रल झोन संघाने पहिल्या डावात १४५.१ षटके फलंदाजी करुन ५११ धावांचा डोंगर उभारुन सामन्यावर वर्चस्व गाजवले. कर्णधार रजत पाटीदार (१०१), यश राठोड (१९४) यांची शानदार फलंदाजी हे त्यांच्या डावाचे खास वैशिष्ट्य ठरले.
त्यानंतर साऊथ झोन संघ दुसरा डाव खेळण्यासाठी मैदानात उतरला. तब्बल ३६२ धावांची पिछाडी भरुन काढण्याचे मोठे आव्हान साऊथ झोन संघासमोर होते. तळाच्या अंकित शर्मा याने १६८ चेंडूत ९९ धावांची शानदार खेळी करुन संघाचा डावाचा पराभव टाळला. त्याने १३ चौकार व १ षटकार मारला. कर्णधार आंद्रे सिद्धार्थ याने १८४ चेंडूंचा सामना करत ८४ धावांची नाबाद खेळी केली. त्याने आपल्या चिवट फलंदाजीत सात चौकार मारले. आघाडीच्या फळीतील समरन रविचंद्रन याने ६७ धावांचे योगदान दिले. अन्य फलंदाज तन्मय अग्रवाल (२६), मोहित काळे ( ३८), रिकी भुई (४५), मोहम्मद अझरुद्दीन (२७), सलमान निझार (१२) यांनी आपापले योगदान दिले. साऊथ झोनचा दुसरा डाव ४२६ धावांवर संपुष्टात आला. सद्यस्थितीत साऊथ झोन संघाकडे केवळ ६४ धावांची आघाडी आहे. त्यामुळे पाचव्या दिवशी सेंट्रल झोन संघ सहजपणे विजेतेपदावर शिक्कामोर्तब करेल हे चौथ्या दिवशीच स्पष्ट झाले आहे.
सेंट्रल झोन संघाकडून कुमार कार्तिकेय याने ११० धावात चार विकेट घेतल्या आहेत. सारांश जैन याने १३० धावांत तीन विकेट घेऊन सामन्यात अष्टपैलू कामगिरी नोंदवली आहे. दीपक चहर याला १ बळी घेण्यासाठी तब्बल ७४ धावा मोजाव्या लागल्या. कुलदीप सेन याने ६० धावांत एक गडी बाद केला.