
मुंबई ः आशिया कपमध्ये दुबईमध्ये होत असलेला भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला शिवसेना ठाकरे गटाकडून कडाडून विरोध करण्यात आला.
रविवारी (१४ सप्टेंबर) राज्यामध्ये सर्वच ठिकाणी शिवसेनेने ठाकरे गटाकडून जोरदार आंदोलन करण्यात आले. माझं कुकूं माझा देश आंदोलन शिवसैनिक महिला आघाडीकडून करण्यात आले. यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिलांसह शिवसैनिक रस्त्यावर उतरले. नाशिकमध्ये मनसेकडून सुद्धा आंदोलन करण्यात आलं. मनसेकडून टीव्ही फोडून आंदोलन करण्यात आले. महिला आघाडीकडून मोदींना सिंदूर सुद्धा पाठवण्यात आले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. सरकारकडून अजूनही सांगण्यात येते की ही मोहीम सुरूच आहे, तर पाक विरोधात सामना कशाला? अशी विचारणा करत शिवसेनेने पाकिस्तान विरुद्ध सामन्याला विरोध केला. त्यामुळे रविवारी शिवसेनेकडून राज्यभर आंदोलनाची हाक देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दुसरीकडे दिल्लीमध्ये शिवसेनेला आंदोलन करण्यास प्रतिबंध करण्यात आला. त्यांना आंदोलनाची परवानगी देण्यात आली नाही. राज्यामध्ये मुंबईसह पुणे, नाशिक, कोल्हापूर छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार आंदोलन करण्यात आले.
शिवसेने इशाऱ्यानंतर मुंबईच्या वानखडे आणि मरीन ड्राईव्ह परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी वानखेडे स्टेडियम परिसरात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त वाढवला आहे. वानखेडे स्टेडियमच्या सर्व गेट्सवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे. विशेषत: पॉली उंबरीकर गेट या महत्त्वाच्या प्रवेशद्वारावर बॅरिकेडिंग लावून सुरक्षा कडक करण्यात आली आहे. दरम्यान, संपूर्ण मरीन ड्राईव्ह परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असून, कार्यकर्त्यांकडून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून सतत नजर ठेवण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन
भारत पाकिस्तान सामन्याला ठाकरे गटाकडून छत्रपती संभाजीनगर शहरात विरोध करण्यात आला. हातात सिंदूर घेऊन महिला आघाडीकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सरकारचं हिंदुत्व खोटं आहे त्यांचा हा दुटप्पीपणा आहे, भाजपचे हेच का हिंदुत्व? असा सवाल अंबादास दानवे यांनी केला.