
मुल्लानपूर : प्रतिका रावल आणि स्मृती मानधना यांच्या विक्रमी कामगिरी नंतरही भारतीय महिला क्रिकेट संघाला पहिल्या एकदिवसीय सामन्यात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाने दोन बाद २८२ धावा फटकावत आठ विकेटने सामना जिंकला.
या सामन्यात टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला प्रतीका रावल आणि स्मृती मानधना यांच्या जोडीने चांगली सुरुवात केली. स्मृती मानधना आणि प्रतीका रावल यांनी पहिल्या विकेटसाठी या सामन्यात ११४ धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलिया महिला संघाविरुद्ध ही एकदिवसीय सामन्यांमधील तिसरी सर्वोच्च सलामी भागीदारी आहे
प्रतिका रावलने ९६ चेंडूत ६ चौकारांसह ६४ धावा केल्या. तर मानधना यांनी ६३ चेंडूत ५८ धावांची खेळी केली. तिने तिच्या डावात सहा चौकार आणि दोन षटकार मारले. हरलीन देओल (५४), रिचा घोष (२५), दीप्ती शर्मा (२०), राधा यादव (१९) यांनी आपापले योगदान दिले. भारताने ७ बाद २८१ धावसंख्या उभारली.
हरमनप्रीत कौर १५० वा सामना
भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरचा हा १५० वा एकदिवसीय सामना आहे. भारतासाठी १५० किंवा त्याहून अधिक एकदिवसीय सामने खेळणारी ती तिसरी महिला खेळाडू आहे. भारतीय महिला संघासाठी सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रम मिताली राजच्या नावावर आहे. तिने २३२ सामने खेळले आहेत, तर झुलन गोस्वामी २०४ सामने खेळून दुसऱ्या क्रमांकावर आहे.
शानदार फलंदाजी
ऑस्ट्रेलियाच्या एलिसा हिली (२७), फोबी लिचफिल्ड (८८) यांनी ४५ धावांची सलामी दिली. एलिस पेरी (३०) ही निवृत्त झाली. त्यानंतर बेथ मूनी (नाबाद ७७), अॅनाबेल सदरलँड (नाबाद ५४) यांनी शानदार फलंदाजी करत संघाला ४४.१ षटकात आठ विकेटने सामना जिंकून दिला.