
छत्रपती संभाजीनगर ः आजच्या वेगवान युगात येणाऱ्या पिढ्यांची आव्हाने समजून घेणे काळाची गरज बनली आहे. मुलं-मुली सोबत संवाद ठेवून खऱ्या अर्थाने आपल्या कुटुंबाचा विकास, अर्थार्जन करत आई कुटुंबव्यवस्थेचा कणा आणि घराचा केंद्रबिंदू आहे. किशोरवयीन मुलांना संस्कार रुपी बाळकडू देण्याची जबाबदारी खऱ्या अर्थाने आईकडे जाते. तेव्हा आईंनी मुलं-मुलीचे मन ओळखणे, त्यांच्यासोबत संवाद साधणे, मुलाचे मित्र होणे गरजेचे असून चांगला माणूस होण्यासाठी आईची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे. म्हणूनच खऱ्या अर्थाने त्यांना जगण्याचे आणि लढण्याचे बळ देणार चालत बोलतं विद्यापीठ म्हणजे आई होय, असे प्रतिपादन डॉ अपर्णा अष्टपुत्रे यांनी केले.
देवगिरी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या आई मेळाव्या प्रसंगी त्या बोलत होत्या. त्यांनी किशोरवयीन मुलांमधील समाज माध्यमाचे वाढते प्राबल्य, आई- मुलांचा एकत्र प्रवास-समज प्रेम आणि आत्मविश्वास या विषयावर टाकलेला प्रकाश लाखमोलाचा ठरला. यावेळी आई पालकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना डॉ. अपर्णा अष्टपुत्रे यांनी समर्पक उत्तरे दिली आणि आई पालकांचे समाधान केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समितीच्या सदस्य नीलिमा सावंत होत्या. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक असे नाते निर्माण करणे गरजेचे आहे जेणेकरून नव्या पिढीसमोर आदर्श निर्माण होईल आईने मुलं आणि मुली सोबत मैत्रीत्वाचे नाते निर्माण करावे अशा सदिच्छा दिल्या.
निमंत्रक प्राचार्य डॉ अशोक तेजनकर, संयोजक उपप्राचार्य प्रा अरुण काटे उपप्राचार्य प्रा सुरेश लिपाने, उपप्राचार्य प्रा विजय नलावडे, उपप्राचार्या डॉ अपर्णा तावरे, जेईई -नीट सेलचे संचालक प्रा एन जी गायकवाड, पर्यवेक्षक डॉ किरण पतंगे, पर्यवेक्षिका डॉ सीमा पाटील, डॉ वंदना जाधव, डॉ कल्याण माळी यांची उपस्थिती होती.
आई मेळावा या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संयोजक उपप्राचार्य प्रा अरुण काटे यांनी मुलांची क्षमता, आवड लक्षात घेऊन त्याला यशस्वी नागरिक बनवणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या मुलं- मुलीची मैत्रीण व्हा, त्यांच्यावर बंधने लादू नका त्याला मुक्तपणाने जगू द्या तुमच्या मुलांनी तुमच्याशी घडलेल्या घटना मनमोकळेपणाने सांगाव्या असे तुमचे व मुलाचे नाते असावे असे आवाहन केले.
या आई मेळाव्यात ४५० पेक्षा जास्त आई पालकांनी सहभाग नोंदवला होता. डॉ तुकाराम वांढरे यांच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख अतिथींचा परिचय डॉ वंदना जाधव यांनी करून दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अरुंधती वाडेवाले यांनी केले. पर्यवेक्षिका डॉ सीमा पाटील यांनी आभार मानले.