
प्रवीण गर्ग यांची अध्यक्षपदी निवड
छत्रपती संभाजीनगर ः वोविनाम असोसिएशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रवीण गर्ग यांची तर शंकर महाबळे यांची महा सचिवपदी निवड करण्यात आली आहे.
नवी दिल्लीतील तालकटोरा इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या १४ व्या राष्ट्रीय वोविनाम मार्शल आर्ट्स चॅम्पियनशिप दरम्यान वोविनाम असोसिएशन ऑफ इंडियाची विशेष सर्वसाधारण सभा आणि निवडणूक झाली. शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालांनुसार प्रवीण गर्ग यांची २०२५ ते २०२९ या कालावधीसाठी एकमताने बिनविरोध अध्यक्षपदी निवड झाली. डिसेंबर २०२४ मध्ये इंडोनेशियातील बाली येथे झालेल्या आशिया वोविनाम फेडरेशनमध्ये सरचिटणीसपदी निवड झाल्यानंतर, भारतात राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड होईल हे निश्चित होते.

यापूर्वी फेडरेशन अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणारे डॉ विष्णू सहाय यांना संस्थापक अध्यक्षपदी नामांकित करण्यात आले, तर सनल कुमार (केरळ), सीता लक्ष्मी गणेशन (तामिळनाडू), पप्पू खान (आसाम), मीर वहाज अली खान (तेलंगणा) आणि हितेश परमार (गुजरात) यांना उपाध्यक्षपदी एकमताने निवडण्यात आले. देवेन मोईरंगथम (मणिपूर) यांची तांत्रिक संचालकपदी निवड करण्यात आली. शंकर महाबळे (महाराष्ट्र) यांची राष्ट्रीय संघटनेच्या सचिवपदी रंजन हलदर (पश्चिम बंगाल), विकास शर्मा (राजस्थान), कमलेश देवांगन (छत्तीसगड) आणि विनोद लाखेरा (उत्तराखंड) यांची सहसचिवपदी निवड झाली.
बैठकीत आगामी कार्यक्रमांबाबत आवश्यक निर्णय घेण्यात आले. केरळ, मध्य प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांनी पुढील राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यासाठी प्रस्ताव दिले.
१ ते ८ नोव्हेंबर दरम्यान इंडोनेशियातील बाली येथे होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंसाठी व्हिएतनाममधील प्रशिक्षकांना बोलावून ऑक्टोबरमध्ये १५ दिवसांचे विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित केले जाईल. भारतीय संघ ३१ ऑक्टोबर रोजी दिल्लीहून बालीला रवाना होईल, अशी माहिती महासचिव शंकर महाबळे यांनी दिली.