
लातूर ः उत्तराखंड येथे नुकत्याच झालेल्या २०व्या कॅडेट राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना लातूरच्या तिन्ही खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर लातूरचा झेंडा अभिमानाने फडकावला आहे.
लातूरची कन्या जान्हवी गणपतराव जाधव हिने आपल्या दमदार खेळाच्या बळावर उत्तराखंडच्या खेळाडूला १५-८, कर्नाटकच्या मुलीला १५-८, चंदीगडच्या मुलीसोबत १५-१० तर छत्तीसगडच्या मुलीला १५-१२ अशा फरकाने हरवून वैयक्तिक कांस्यपदक मिळवले. तसेच सांघिक गटातही कांस्यपदक पटकावून दुहेरी यश संपादन केले. तिच्या बरोबरीनेच रोहिणी देवराव पाटील हिने देखील सांघिक कांस्यपदक जिंकून लातूरच्या खेळाडूंचा दबदबा राष्ट्रीय पातळीवर अधोरेखित केला आहे.
मुलांच्या गटात साईप्रसाद संग्राम जंगवाड याने आपल्या दमदार खेळाचे दर्शन घडवत सांघिक रौप्यपदक तसेच मणिपूर मुला सोबत १५-६, उत्तराखंड मुला सोबत १५-८ तर मणिपूरच्या मुला सोबत १५-५ असे विजय नोंदवत वैयक्तिक कांस्यपदक पटकावले.
या तिन्ही खेळाडूंनी मिळवलेली पदके ही त्यांच्या मेहनती, चिकाटी आणि जिद्दीची फळे असून त्यांच्या यशामुळे लातूर जिल्ह्याचा क्रीडा अभिमान दुणावला आहे. या यशामागे खेळाडूंचे शिस्तबद्ध प्रशिक्षण, पालकांचा पाठिंबा आणि प्रशिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन अधोरेखित होते. लातूरच्या खेळाडूंनी मिळवलेले हे यश इतर तरुण खेळाडूंना प्रेरणादायी ठरणार असून लातूरच्या क्रीडा इतिहासात ही एक उल्लेखनीय नोंद ठरली आहे.
या खेळाडूंना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त प्रा दत्ता गलाले, वजीरोदीन काजी, मोसिन शेख, रोहित गलाले, आकाश बनसोडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. गुणवंत खेळाडूंचे जिल्हा क्रीडा कार्यालय लातूर, शिवछत्रपती क्रीडा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त गणपतराव माने, लातूर तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष अभिजीत मोरे, प्रशांत माने, संतोष कदम, वैभव कज्जेवाड, मेहफूजखान पठाण आणि लातूरच्या सर्व क्रीडाप्रेमींनी अभिनंदन केले आहे.