
राष्ट्रीय एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत चमकदार प्रदर्शन
छत्रपती संभाजीनगर ः गायकवाड ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ऑल एज ग्रुप एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत चमकदार कामगिरी नोंदवत चार सुवर्णपदके पटकावली.
एर्नाकुलम, केरळ या ठिकाणी ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत गायकवाड ग्लोबल स्कूलच्या खेळाडूंनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना शानदार कामगिरी नोंदवत सुवर्णपदके जिंकून शाळेचा आणि छत्रपती संभाजीनगर शहराचा मान उंचावला आहे.
या स्पर्धेत आराध्या महेशवाजे हिने महिला गट स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. प्रणित बोडखे याने अॅरोडान्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. अवंतिका सानप हिने दोन सुवर्णपदके जिंकली आहेत. एक महिला वैयक्तिक एरोबिक्स स्पर्धेत आणि एक महिला गट एरोबिक्स स्पर्धेत तिने सुवर्ण यश संपादन केले आहे.
शाळेच्या विकासाच्या ध्येयाची प्रचिती – कुलभूषण गायकवाड
या विजयी विद्यार्थ्यांचा शाळेत व्यवस्थापकीय संचालक कुलभूषण गायकवाड आणि कार्यकारी संचालक नंदकुमार दंडाले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे, शिस्तीचे व जिद्दीचे कौतुक करत, शैक्षणिक क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनाची नोंद घेतली. तसेच अशा यशस्वी कामगिरीमुळे संपूर्ण विद्यार्थीवर्ग प्रेरित होत असल्याचे त्यांनी नमूद केले. आराध्या, प्रणित आणि अवंतिका यांच्या या उल्लेखनीय यशाने शाळेच्या सर्वांगीण विकासाच्या ध्येयाची प्रचिती दिली असून राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांना घडविण्याच्या शाळेच्या प्रयत्नांना बळकटी दिली आहे.
गायकवाड ग्लोबल स्कूलतर्फे या सुवर्णताऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या भावी क्रीडा वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत. शाळा व्यवस्थापन अध्यक्ष प्रा रामदास गायकवाड, संस्थापिका कलिंदाताई गायकवाड, व्यवस्थापकीय संचालक कुलभूषण गायकवाड, संचालक नंदकुमार दंडाले आणि प्राचार्या डॉ सुलेखा ढगे यांनी सर्व खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन करत त्यांच्या प्रेरणादायी कामगिरीचे कौतुक केले.