
ठाणे ः जेएसकेकेओ लोढा पॅराडाईज व बुद्ध विहार, ठाणे केंद्रातील कराटेपटूंनी अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे पार पडलेल्या आठव्या आशियाई आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेत जपान, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, भूतान व भारतातील तब्बल २५०० हून अधिक कराटेपटूंनी उत्साह व जिद्दीने भाग घेतला.
ठाण्याच्या कराटेपटूंनी उत्कृष्ट कामगिरी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर ठाण्याचे प्रतिनिधित्व अभिमानाने केले व मानाची बेस्ट टीम ट्रॉफी मिळवून एकूण १९ पदके पटकावली. त्यात ५ सुवर्ण, ७ रौप्य व ७ कांस्य पदकांचा समावेश आहे.
ही अभूतपूर्व कामगिरी शक्य झाली ती स्पर्श कदम, आदित्य भोईर व रंगराजन यांच्या गतिमान मार्गदर्शनामुळे. सर्व कराटेपटूंचे प्रशिक्षण गुरमित सिंग व डॉ गिरीश कदम यांच्या देखरेखीखाली झाले. त्यांच्या दूरदृष्टी व शिस्तीमुळेच या यशाची पायाभरणी झाली.
डॉ गिरीश कदम यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व प्रशिक्षकांच्या मेहनतीचे, जिद्दीचे व समर्पणाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, हा विजय केवळ पदकांचा आकडा नसून, आपल्या तरुण कराटेपटूंच्या शिस्तबद्ध मेहनतीचा, संघभावनेचा आणि लढाऊवृत्ती याचा पुरावा आहे.
हा ठाण्याचा अभिमानाचा क्षण आहे, जो प्रत्येक विद्यार्थ्याला कराटेच्या विश्वात अजून उंच भरारी घेण्याची प्रेरणा देईल. सर्व पदक विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार लोढा पॅराडाईज को-ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशन लिमिटेडचे सचिव डॉ सालवी यांच्या हस्ते करण्यात आला. आपल्या प्रेरणादायी भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे कौतुक केले तसेच प्रशिक्षकांच्या कठोर परिश्रमांची दाद दिली.
पदक विजेते
सान्वी भालेराव (१ रौप्य, १ कांस्य), आरोही पोकळे (२ रौप्य), दक्ष कृष्णकुमार (१ रौप्य, १ कांस्य), प्रज्वल देशमुख (१ सुवर्ण, १ कांस्य), रियान्श राणे (१ सुवर्ण, १ रौप्य), हित्था रेंगराजन (१ सुवर्ण), नभा कुलकर्णी (१ रौप्य, १ कांस्य), कपिश पंडित (१ सुवर्ण, १ कांस्य), अमृतकौर गुरमित सिंग खाकरू (१ रौप्य), विहान रावल (१ सुवर्ण, १ कांस्य), जिविन अप्पारी (१ कांस्य).