
ठाणे ः रोटरी क्लब ऑफ ठाणे मेट्रोतर्फे आयोजित नेशन बिल्डर अवॉर्ड समारंभात श्री मावळी मंडळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, ठाणे येथे गेल्या १७ वर्षांपासून कार्यरत असलेले समर्पित क्रीडा शिक्षक प्रमोद धोंडीराम वाघमोडे यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
विष्णुनगर, ठाणे येथील रोटरी सेंटरमध्ये पार पडलेल्या या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभाग प्रमुख डॉ नमिता निंबाळकर उपस्थित होत्या. रोटरी क्लबचे अध्यक्ष रामराव यवगाळ व सचिव रघु चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात प्रमोद वाघमोडे यांच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यात आला.
क्रीडा शिक्षण, विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आरोग्य जागरूकता व सामाजिक बांधिलकी या क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन प्रमोद वाघमोडे यांना हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. या सन्मानाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रमोद वाघमोडे म्हणाले की, “श्री मावळी मंडळ, ठाणे या क्रीडा संस्थेच्या संचलित शाळेत गेली १७ वर्षांपासून अखंडपणे सेवा करत असताना अनेक विद्यार्थ्यांनी जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली. संस्थेचे अध्यक्ष, विश्वस्त, क्रियाशील कार्यकर्ते, मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवर्ग, इतर कर्मचारी, माझी आजी, सर्व विद्यार्थी व पालक यांच्या सहकार्यामुळेच हे चांगले काम घडले. हा पुरस्कार म्हणजे या सर्वांच्या सहकार्यातून झालेल्या कार्याचेच एक प्रतीक आहे.”