
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगरची नवोदित बास्केटबॉल खेळाडू केतकी धनगरे हिने सोलापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय सब-ज्युनियर बास्केटबॉल स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर संघाकडून खेळताना उत्कृष्ट कामगिरी केली. त्यामुळे महाराष्ट्र राज्य सब-ज्युनियर गर्ल्स प्रॉस्पेक्टिव्ह बास्केटबॉल संघात केतकीने स्थान मिळवले आहे.
केतकी वयाच्या ८ व्या वर्षापासून आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक संदीप ढंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली चॅम्पियन्स स्पोर्ट्स बोर्डमध्ये बास्केटबॉलचे प्रशिक्षण घेत आहे. केतकी राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी दृढनिश्चयी होती. आंतरराष्ट्रीय खेळाडू खुशी डोंगरेकडून तिला प्रेरणा मिळाली. तिचे स्वप्न भारतीय संघासाठी खेळण्याचे आहे. यासाठी ती खूप मेहनत घेत आहे. केतकी ही शारदा मंदिर कन्या शाळेत आठवी इयत्तेत शिकत आहे.
४ ऑक्टोबर रोजी उत्तराखंडमधील देहरादून येथे होणाऱ्या राष्ट्रीय सब-ज्युनियर बास्केटबॉल चॅम्पियनशिपच्या तयारीसाठी, महाराष्ट्र प्रॉस्पेक्टिव्ह टीम १८ सप्टेंबर २०२५ पासून पुणे येथील नाहाटा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे प्रशिक्षण शिबिर आयोजित करणार आहे. केतकी ही आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक संदीप ढंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली चॅम्पियन क्रीडा मंडळ, बेगमपुरा येथे प्रशिक्षण घेत असून तिला ॲड संजय डोंगरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.