
कुलगुरू माधुरी कानिटकर यांचे प्रतिपादन
नाशिक ः आपत्कालीन परिस्थितीसाठी आरोग्यविषयक उपचारांचे सर्वांना प्रशिक्षण असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांनी केले.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात ’इमर्जन्सी मेडिसिन’ विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभास अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या कुलगुरू माधुरी कानिटकर या होत्या. या प्रसंगी महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या अधिष्ठाता डॉ मृणाल पाटील, आपत्कानील औषध विभागाच्या प्रमुख डॉ सुहासिनी सोनावडेकर यांची उपस्थिती होती.
यावेळी कुलगुरू माधुरी कानिटकर यांनी सांगितले की, आपत्कालीन स्थितीत आरोग्य विषयक उपचार देण्याची कौशल्य प्रत्येकात असणे आवश्यक आहे. नैर्सगिक आपत्ती किंवा अन्य आपत्ती जसे भूकंप, आग, पूर, वादळ, रोगराई, युद्ध आणि अपघात यासारख्या परिस्थितीला सामोरे जाताना आपत्कालीन स्थितीत प्रथमोपचार नितांत गरजेचे असतात. यासाठी आपत्कालीन स्थितीत आरोग्यसेवा प्रशिक्षण व आरोग्य कर्मचाऱ्यांची कौशल्ये सुधारणे गरजचे आहे. या प्रशिक्षणामुळे क्षमता विकास, कौशल्य विकासावर प्राधन्य देण्यात येणार आहे.
कुलगुरू कानिटकर पुढे म्हणाल्या की, या कार्यशाळेच्या माध्यमातून साथीचे रोग, रस्ते अपघात यांसारख्या परिस्थितीत आवश्यक असलेली तत्परता आणि तयारी राखण्यासाठी कौशल्य महत्वपूर्ण आहेत. आपत्कालिन स्थितीत ट्रॉमा केअर महत्वाचे आहे. आरोग्य शिक्षणातील विद्यार्थ्यांनासाठी बेसिक डिझास्टर लाईफ सपोर्ट, ऑडव्हांस डिसास्टर लाईफ सपोर्ट सारखे आपत्कालीन विषयावरील पदवी व फेलोशिप अभ्यासक्रम महत्वाचे आहेत. नैसर्गिक आपत्ती व पुनर्वसन दलाप्रमाणे आपत्कालीन सेवा देण्यासाठी आपण सदैव तत्पर असावे असे त्यांनी सांगितले.
यावेळी महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या अधिष्ठाता डॉ मृणाल पाटील, प्रशिक्षक डॉ साजिथ कुमार पी, डॉ सुहासिनी सोनावडेकर यांनी मार्गदर्शन केले. डॉ चित्रा नेतारे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी डॉ समीर चंद्रात्रे, डॉ हर्ष चौधरी, विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यशाळेकरीता वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.