बॅडमिंटनपटूंनी संयम राखणे शिकायला हवे ः प्रणॉय

  • By admin
  • September 18, 2025
  • 0
  • 6 Views
Spread the love

पुणे् ः ‘सध्या देशभरात लाखो मुले बॅडमिंटन खेळत आहेत. त्यातून पुढे येणे अजिबात सोप्पे काम नाही. तेव्हा संयम राखणे शिकायला हवे. तुमच्या मेहनतीला नक्की फळ मिळेल,’ असे मत भारताचा अनुभवी बॅडमिंटनपटू एच एस प्रणॉय याने व्यक्त केले.

रोटरी क्लब ऑफ पिंपळे सौदागर यांच्या वतीने रामा ग्रुप यांच्या संलग्नतेने आयोजित रोटरी व रामा ग्रुप पुरस्कृत जिल्हास्तरीय सुपर १०० मानांकन बॅडमिंटन स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाप्रसंगी ३३ वर्षीय प्रणॉय पुण्यात आला होता. एसीई अरेना स्पोर्ट्स लँड आहेर नगर वाल्हेकर वाडी चिंचवड व ग्रॅव्हिटी पुनावळे येथे ही स्पर्धा झाली.

या वेळी बोलताना जागतिक क्रमवारीत ३व्या क्रमांकावर असलेला प्रणॉय म्हणाला, ‘बॅडमिंटन हा वेगवान खेळ आहे. तुम्हाला पूर्ण वर्षभराच्या स्पर्धांचे नियोजन करता यायला हवे. यात सातत्य राखणे आणि दीर्घकाळ खेळत राहणे सोपे नाही. त्याचबरोबर हा महागडा खेळ आहे. त्याला आर्थिक नियोजनाची जोड द्यावी लागते. तेव्हा रोटरी सारख्या संस्थेचे कौतुक आहे. चांगल्या मुलांचा शोध घेऊन, त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करणे गरजेचे आहे. देशभरातून असा पाठिंबा खेळाडूंना मिळायला हवा. कारण, गुणवान खेळाडूंची आपल्याकडे कमतरता नाही. रोटरी सारख्या संस्थांनी खेळाडूंच्या मदतीसाठी पुढे यायला हवे. जेणेकरून भविष्यात ऑलिम्पिक, जागतिक स्पर्धेसाठी आपल्याला चांगले खेळाडू मिळतील.’ यानंतर त्याने खेळाडूंना आपल्या सहीचे शटलही दिले. त्यामुळे खेळाडूंचा आनंद गगनात मावत नव्हता. त्याने थोडा वेळ खेळाडूंसोबत खेळण्याचा आनंद देखील लुटला.

लक्ष्य सेन आणि प्रणॉयमध्ये मागाली काही काळात चांगल्या लढती रंगल्या. प्रणॉय याने सेन याचेही कौतुक केले. आयुष शेट्टीसारखे खेळाडू असल्याने भारताचे भविष्य उज्ज्वल आहे, असेही तो म्हणाला. मागीला काही महिन्यांपासून कामगिरीत सातत्य राखता आले नाही, याची कबुलीही प्रणॉयने दिली. मात्र, वयाच्या तिशीनंतर पूर्वीसारखा खेळ करणे शक्य होत नाही. नक्कीच मर्यादा येतात. मात्र, त्यावर मात करण्याचा खेळाडूंचा प्रयत्न असतो. खेळाडूसाठी दीर्घ कारकिर्दीत दुखापत न होता खेळणे सोपे नसते, असे सांगायलाही तो विसरला नाही. निवृत्तीचा विचार नसून, आणखी काही वर्षे खेळणार असल्याचे त्याने स्पष्ट केले.

३३ वर्षीय प्रणॉयने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ब्राँझपदक मिळवले असून, २०२२मधील ऐतिहासिक सांघिक सुवर्णपदकात त्याचा मोलाचा वाटा होता. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्याने सुवर्णपदक मिळवले असून, आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन पदके त्याच्या नावावर आहेत. त्यामुळे कारकिर्द बाबत समाधानी असल्याचे देखील त्याने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *