
अनुभूती स्कूलच्या खेळाडूंनी जिंकली तीन पदके
जळगाव ः सीआयएससीई सहाव्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सलामीच्या दिवशी महाराष्ट्रातील खेळाडूंनी शानदार कामगिरी नोंदवत ११ पदके जिंकली. त्यात ५ सुवर्ण, २ रौप्य आणि ४ कांस्य पदकांचा समावेश आहे. जळगावच्या अनुभूती स्कूलच्या विद्यार्थिनींनी पहिल्याच दिवशी तीन पदके मिळवून आपला ठसा उमटवीत महाराष्ट्राच्या वर्चस्वात मोलाची कामगिरी केली.
अनुभूती स्कूलच्या बॅडमिंटन हॉलमध्ये राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेला आरंभ झाला. आंतरराष्ट्रीय पंच ए टी राजीव यांनी मॅट पूजन करून स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन केले. पहिल्याच दिवशी खेळाडूंनी दमदार कामगिरी सादर केली. १९ वर्षांखालील ४० किलो गटात बिहार-झारखंडच्या अनिष्का शर्मा आणि कर्नाटक-गोव्याच्या रॅचेल रॉस यांच्यात तर १४ वर्षांखालील ३२ किलो गटात केरळच्या नितारा एस आणि अंदमान-निकोबार व तामिळनाडूच्या डी कीर्ती बाला पहिला औपचारिक सामना झाला. स्पर्धेच्या पहिल्या सत्रातील विजेत्यांना जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे उपाध्यक्ष ललित पाटील, सदस्य महेश घारगे, जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू तृप्ती तायडे, अरविंद देशपांडे आणि अजित घारगे यांच्या हस्ते सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांनी गौरविण्यात आले.
अनुभूती स्कूलच्या विद्यार्थीनींना तीन पदके
१९ वर्षांआतील वयोगटातील स्पर्धेत जळगावच्या अनुभूती स्कूलची अलेफिया शाकीर हिने ६८ किलो वजन गटात कांस्यपदक मिळवले. तसेच ४९ किलो गटात अनुभूती स्कूलची समृद्धी कुकरेजा हिला कांस्यपदक मिळवले. अनुभूती स्कूलच्या पलक सुराणा हिलाही रौप्य पदक मिळाले.
१९ वर्षांखालील मुलींच्या ४० किलोच्या गटात सुवर्णपदक उत्तर प्रदेशातील मानवी सिंग हिने मिळवले. पश्चिम बंगालची ज्योस्त्ना उप्पी हिने रौप्य पदक मिळवले. कांस्य पदक रचेल रिमा (कर्नाटक आणि गोवा) आणि मनप्रित कौर (उत्तर भारत) हिला मिळाले. १९ वर्षांखालील ४२ किलोच्या गटात महाराष्ट्राची अवनी माने हिने सुवर्णपदक जिंकले. रौप्य पदक उत्तर प्रदेशातील दिया सिंग तर कांस्य पदक उत्तर भारतातील भावजित कौर आणि कर्नाटकामधील काव्य हिला मिळाले.
१९ वर्षांखालील ४४ किलोच्या गटात सुवर्णपदक उत्तर प्रदेशातील कुंजिका बिंडल हिने पटकावले. रौप्य पदक बिहारच्या अंजेल मर्या हिला तर कांस्य पदक डी गौडा (कर्नाटक) आणि तामिळनाडूमधील रितिका श्री हिला मिळाले. १९ वर्षांखालील मुलींच्या ४६ किलो गटात कर्नाटक आणि गोवामधील आर फातिमा हिने सुवर्णपदक मिळवले. या गटात रौप्य पदक उत्तर भारतातील सरबोत कौर तर कांस्य पदक अम्मी (उत्तर प्रदेश) आणि आदिती मिश्रा (बिहार) यांना मिळाले.
१९ वर्षांखालील ४९ च्या गटात उत्तर प्रदेशातील माया अग्रवाल हिने सुवर्णपदक तर आंध्र प्रदेशातील श्रेया गुप्ताने कांस्य पदक मिळवले. महाराष्ट्रातील सुमधी कुकरेजा आणि तामिळनाडूमधील हर्षिता यांनी कांस्य पदक मिळवले. १९ वर्षांखालील ५२ किलोच्या गटात उत्तर प्रदेशातील इशाका जैस्वाल हिने सुवर्णपदक मिळवले. रौप्य पदक कर्नाटक आणि गोवा मधील प्रीती मानेने मिळवले. कांस्य पदक बिहार आणि झारखंडमधील एस घोष आणि महाराष्ट्रातील जिनी शहा यांना मिळाले. १९ वर्षांआतील ५५ किलोच्या गटात उत्तर प्रदेशातील आर्या बाजपेयी हिने सुवर्णपदक तर आंध्र प्रदेशातील बी रेड्डी हिला रौप्य पदक मिळाले. कांस्य पदक महाराष्ट्रातील सावी तिवार आणि उत्तर भारतातील प्रणीत कौर यांना मिळाले.
१९ वर्षांखालील ६८ किलोच्या गटात उत्तर प्रदेशातील आराध्य सिंग हिने सुवर्ण तर कर्नाटक आणि गोवामधील चारिथा हिने रौप्य पदक जिंकले. कांस्य पदक बिहारमधील महिमा सिंग आणि महाराष्ट्रातील अफिया हिला मिळाले. १४ वर्षांच्या ३२ किलोच्या मुलींच्या गटात महाराष्ट्रातील तनिष्का डिगे हिने सुवर्णपदक मिळवले. कर्नाटक आणि गोवामधील साची हंगल हिने रौप्य तर आराध्य वर्मा (उत्तर प्रदेश) आणि केरळमधील नितरा हिने रौप्यपदक मिळवले. १४ वर्षांच्या मुलींच्या २९ किलोच्या गटात कर्नाटक-गोवाची नयना प्रिया हिने सुवर्णपदक तर महाराष्ट्रातील अरल कासरे हिने रौप्य पदक मिळवले. या गटात उन्नती (बिहार आणि झारखंड) अनुष्का (आंध्र प्रदेश व तेलंगणा) यांनी मिळवले.