
डी ११ टी २० लीग क्रिकेट ः आकाश बोराडे, बबलू पठाण सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः डी स्पोर्ट्स प्रेझेंट्स डी ११ टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यात इम्रान पटेल २२ नाबाद संघाने इथिकल क्रिकेट अकादमीचा तब्बल ७४ धावांनी पराभव करत आगेकूच केली. दुसऱया सामन्यात इम्रान पटेल २२ नाबाद संघाने मायटी ग्लॅडिएटर्स संघावर ४७ धावांनी विजय साकारला. या लढतींमध्ये आकाश बोराडे आणि बबलू पठाण यांनी सामनावीर पुरस्कार संपादन केला.

रुफीट क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. पहिल्या सामन्यात इम्रान पटेल २२ नाबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत २० षटकात आठ बाद १६६ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलागा करताना इथिकल क्रिकेट अकादमी संघ १६.२ षटकात अवघ्या ९२ ध२वांत सर्वबाद झाला. इथिकल अकादमीला ७४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
या सामन्यात आदित्य राजहंस याने ४५ चेंडूत ६३ धावांची दमदार खेळी साकारली. आदित्यने तीन टोलेजंग षटकार व पाच चौकार मारले. आकाश बोराडे याने अवघ्या १७ चेंडूत २८ धावांची आक्रमक खेळी केली. त्याने दोन उत्तुंग षटकार व तीन चौकार मारले. अविनाश मुके याने २२ चेंडूत २४ धावांची वेगवान खेळी केली. त्याने दोन षटकार मारले. गोलंदाजीत मोहम्मद इम्रान याने घातक गोलंदाजी करत २६ धावांत चार विकेट घेऊन सामना गाजवला. मयूर वैष्णव याने २० धावांत तीन गडी बाद केले. आकाश बोराडे याने २६ धावांत तीन बळी घेतले. आकाशला अष्टपैलू कामगिरीबद्दल सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मायटी ग्लॅडिएटर पराभूत
अन्य एका सामन्यात इम्रान पटेल २२ नाबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात नऊ बाद १४६ धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात मायटी ग्लॅडिएटर्स संघाचा डाव १७.१ षटकात अवघ्या ९९ धावांत गडगडला. इम्रान पटेल २२ नाबाद संघाने ४७ धावांनी विजय साकारला. बबलू पठाण याने सामनावीर पुरस्कार संपादन केला.
कमी धावसंख्येच्या या सामन्यात आदित्य राजहंस याने २९ धावा काढल्या. शुभम हरकळ याने २४ तर आर्यन शेजुळ याने २२ धावांचे योगदान दिले. गोलंदाजीत बबलू पठाण याने २२ धावांत चार तर भास्कर जीवरग याने २५ धावांत चार विकेट घेऊन सामना गाजवला. साई चौधरी याने २० धावांत तीन गडी बाद केले.