आंतरराष्ट्रीय दिव्यांग क्रिकेटपटू गंगा कदम अजूनही शासकीय नोकरीच्या शोधात

  • By admin
  • September 19, 2025
  • 0
  • 43 Views
Spread the love

दृष्टी केवळ डोळ्यांची नाही, तर आत्मविश्वासाची असते. ती जिथे जिथे गेली तिथे तिथे विजय मिळवूनच आली. या खेळाडूचं नाव आहे सोलापूरची गंगा संभाजी कदम. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत पोहोचलेली गंगा कदम ही अंध महिलांच्या पहिल्या टी २० क्रिकेट स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. फक्त प्रतिनिधीत्वच नाही तर ती भारतीय संघाच्या उपकर्णधार पदाची देखील जबाबदारी सांभाळणार आहे. भारतीय संघात निवड झालेली गंगा ही महाराष्ट्राची एकमेव खेळाडू आहे. तिच्या या निवडीमुळे सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तूरा रोवला गेला आहे. उपकर्णधार गंगा कदमच्या कारकिर्दीचा घेतलेला आढावा…

– अजितकुमार संगवे,सोलापूर
(९८८११३३१०३)

बंगळुरू येथे क्रिकेट असोसिएशन फॉर दि ब्लाईन्ड इन इंडियाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत आगामी काळात होणाऱ्या अंध महिलांच्या पहिल्या टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. यात महाराष्ट्राच्या गंगा कदम हिची उपकर्णधार तर कर्नाटकची दीपिका टी. सी. हिची कर्णधार म्हणून घोषणा करण्यात आली आहे.  विश्वचषकातील हे सामने ११ ते २५ नोव्हेंबर दरम्यान दिल्ली, बंगळुरू व काठमांडू (नेपाळ) येथे होणार आहेत. या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, अमेरीका, पाकिस्तान, श्रीलंका व नेपाळ या ७ देशांचे संघ सहभागी होणार आहेत.

१ ते ५ सप्टेंबर दरम्यान बंगळुरू येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील आंतर विभागीय क्रिकेट स्पर्धेत गंगा ही पश्चीम भारत संघाची कर्णधार होती. पश्चिम भारत संघाकडून खेळताना सामन्यातील सर्व तिन्ही साखळी सामने जिंकले. अंतिम सामन्यात दक्षिण भारत संघाचा ३० धावांनी पराभव करत पश्चिम भारत संघाने मालिका जिंकली. गंगा कदम ही या मालिकेची मालिकावीर ठरली. गंगा कदम ही सोलापूर येथील जामश्री इलिजीअयम क्रिकेट क्लब दमाणीनगर येथे ती सध्या प्रशिक्षक राजू शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचा सराव करत आहे.

गंगाच्या कामगिरीचा आलेख चढताच
गंगा हिचा जन्म फुटाना (हिंगोली) येथील एका शेतमजुर कुटुंबात झाला. ८ बहिणी व एक भाऊ असा त्यांचा मोठा परिवार. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाकीची. त्यांच्या पालकांनी तिला शिक्षणासाठी सोलापूर येथील भैरुरतन दमाणी अंधशाळेत २०१२ मध्ये घातले. शाळेचे सचिव संतोष भंडारी आणि मुख्याध्यापक प्रकाश दर्शनाळे यांच्या मार्गदर्शनामुळे सुरुवातीस धावणे व गोळाफेकमध्ये भाग घेतला. शालेय शिक्षण घेत असताना शाळेतील मुले क्रिकेट खेळत असलेली पाहून तिलाही क्रिकेटची आवड निर्माण झाली. भैरूरतन दमाणी अंधशाळेत दहावीपर्यंत, बारावीपर्यंत ह. दे. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेतले. इयत्ता सातवीत शिकत असल्यापासून तिला क्रिकेटचे धडे राजू  शेळके यांनी दिले.

२०१७ पासून तिच्या कामगिरीस सुरूवात झाली. त्यानंतर तिने मागे वळून पहिले नाही. नाशिक येथे झालेल्या पहिल्या अंध महिलांच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये पश्चिम महाराष्ट्र संघातून सोलापूरच्या ६ मुली सहभागी होत्या. त्यात गंगा कदमचा समावेश होता. या स्पर्धेत पश्चीम महाराष्ट्र संघाने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. या स्पर्धेत गंगाला तीनवेळा मालिकावीर म्हणून सन्मानित करण्यात आले. नागपूर येथे झालेल्या खासदार चषक स्पर्धेत यष्टीरक्षकाचे देखील पारितोषिक मिळाले.

क्रिकेट असोसिएशन ब्लाईंड ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय स्पर्धेत २०१९ पासून गंगा कदम आजतागायत महाराष्ट्र राज्य अंध महिला क्रिकेट संघाची कर्णधार आहे. या कामगिरीवरच गंगाची पहिल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. एप्रिल २०२३ मध्ये भोपाळ येथे झालेल्या निवड शिबीरात गंगा हिने पहिल्या भारतीय अंध महिला क्रिकेट संघात आपले स्थान निश्चित केले. भारतीय संघाची पहिली आंतरराष्ट्रीय मालिका ही नेपाळमध्ये झाली. दोन-तीन अशी हरली तरी त्यात भारतीय संघाकडुन गंगा कदम हिने आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.

त्यानंतर ऑगस्ट २३ मध्ये इंटरनॅशनल ब्लाइंड स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने बर्मिंगहॅम (इंग्लंड) येथे झालेल्या अंध महिलांच्या जागतिक क्रिकेट स्पर्धेमध्ये भारतीय संघाने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन सुवर्ण पदक प्राप्त केले. यात गंगाने भेदक गोलंदाजी करताना २ षटकात ३ बळी घेतले. तिच्या या उत्कृष्ट कामगीरीमुळे भारतीय संघास सुवर्ण पदक प्राप्त झाले. त्यानंतर मुंबई येथे डिसेंबर २०२३ मध्ये झालेल्या नेपाळ विरुद्धच्या मालिकेत भारताने ३-१ असा दणदणीत विजय मिळवला.

अविस्मरणीय कामगिरी
जानेवारी २०२५ मध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रिकेट सामन्यात तिने तेलंगणा विरुद्धच्या सामन्यात ७७ चेंडुत १४ चौकारांच्या मदतीने १३१ धावांची उत्कृष्ट खेळी करत महाराष्ट्र संघाला विजय मिळवून दिला. तिने गोलंदाजीत दोन गडीही बाद केले. ही तिची अविस्मरणीय कामगिरी.

शासनाच्या थेट नियुक्तीपासून वंचित
घरची अतिशय हलाकीची परिस्थिती असताना ८ बहिणींमध्ये गंगा अंध असताना परिस्थितीशी योग्य लढा देऊन तिने हे यश प्राप्त केले. मुंबई येथील कीर्ती कॉलेजमध्ये बीए शाखेची पदवी मिळाल्यानंतर  एमए राज्यशास्त्र ही पदव्युत्तर पदवीही तिने पूर्ण केली. तीन आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा खेळूनही ती शासकीय नोकरीच्या शोधात आहे. त्यासाठी ती एमपीएससीची तयारी करीत आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडूंना शासन थेट नियुक्ती देते. परंतु गंगा ही या नियुक्तीपासून वंचित आहे.

शिष्याने वर्ल्ड कप खेळण्याचा आनंद : प्रशिक्षक राजू शेळके
माझी शिष्य पहिली टी २० वर्ल्ड कप खेळत असल्याचा मनापासून आनंद होत आहे. तिच्या या निवडीमुळे मला माझे भारतीय संघाकडुन क्रिकेट खेळण्याचे स्वप्न कोठेतरी तिच्या माध्यमातून पूर्ण होत असल्याची अनूभूती येत असल्याची भावना गंगा कदमचे प्रशिक्षक राजू शेळके यांनी व्यक्त केली. गंगाच्या नेतृत्वातील भारतीय संघ हा निश्चित विश्वचषक जिंकून देईल यात कोणतीही शंका नाही.  गंगा हिने २०१७ पासून मेहनत करून पश्चिम विभाग, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशी कामगिरी करण्यात सातत्य ठेवले आहे. गंगाने ८ वर्षाच्या तपश्चर्येनंतर  ‘वर्ल्ड कप’ निवडीची क्षमता सिद्ध केली असल्याचे राजू शेळके हे म्हणतात.

प्रशिक्षक राजू शेळके यांच्या कामगिरीचा आलेख
प्रशिक्षक राजू शेळके यांचे शालेय शिक्षण हे सोलापूर येथील भैरुरतन दमाणी अंध शाळेत झाले. शालेय जीवनापासून मला क्रिकेटची प्रचंड आवड. शालेय क्रिकेट सामन्यापासून या प्रवासाची सुरूवात झाली. महाविद्यालयीन शिक्षण हरीभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालय येथे झाले. पहिला राज्यस्तरीय सामना मी नाशिक संघाकडुन २००३ मध्ये खेळलो.  त्यानंतर सोलापूर क्रिकेट संघाकडून क्रिकेट खेळत आहे.  २०१४ मध्ये  महाराष्ट्र राज्याच्या क्रिकेट संघात पहिल्यांदा निवड झाली.  त्यानंतर २०१९ पर्यंत महाराष्ट्र संघाकडून अनेक सामने खेळलो. विशेषत: अहमदाबाद गुजरात येथे  २०१७मध्ये झालेल्या राष्ट्रीय सामन्यात मोठे योगदान देता आले. त्यानंतर राजस्थान, कर्नाटक अशा विविध ठिकाणी राष्ट्रीय सामने खेळलो.  २०२१ नंतर व्यावसायिक क्रिकेट खेळने बंद केले. परंतू जेवढे दिवस मी क्रिकेट खेळलो, तेव्हा मला नेहमी वाटायचे की मला भारतीय संघाकडुन क्रिकेट खेळण्याची संधी मिळावी. परंतु, अनेक क्रिकेटर्स प्रमाणे माझेही हे स्वप्न अपूर्ण राहिले.  तरीही कधी-कधी मनाला नेहमी वाटायचे की आपण देशासाठी खेळले पाहिजे.

दरम्यानच्या काळात मी भैरुरतन दमाणी अंध शाळेतील मुलांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी तसेच त्यांना क्रिकेट शिकविण्यासाठी सुट्टी दिवशी जात असे.  तेव्हा मला शाळेतील एक ७वीत शिकणारी लहान मुलगी गंगा कदम ही नेहमी म्हणायची की, मलाही क्रिकेट शिकायचे आहे. लहान मुलगी आहे तिला खेळताना दुखापत होईल म्हणून प्रथमत: मी तिला टाळलं. परंतु तिने सतत माझा पाठपुरावा करत क्रिकेट शिकविणेबाबत हट्ट धरला. त्यानंतर मग मी तिला क्रिकेट खेळाचे धडे दिले. तिनेही क्रिकेट अगदी मन लावून जिद्दीने शिकली. २०१७ ते आजतागायत ती महाराष्ट्र संघाची कर्णधार राहिली आहे.  २०१९ ते २०२५  पर्यंतच्या राष्ट्रीय सामन्यात तिच्या खेळाचा आलेख हा उत्तरोत्तर चढताच राहिलेला आहे.  अंध महिलांचा २०२३मध्ये जेव्हा राष्ट्रीय स्तरावरील पहिला संघ जाहीर झाला तेव्हा त्या पहिल्या संघात गंगा हिची निवड ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट होती.

गंगाबरोबरच महाराष्ट्र संघात निवडलेल्या सोलापूरच्या अस्मिता बनसोडे, स्नेहल कोरे, आसावरी यादव, सुजाता माळी व कार्तिकी खांडेकर यांना घडविले असा मला आनंद आहे. अंध महिलांची पहिली टी २० विश्वचषक स्पर्धा नोव्हेंबरमध्ये  होत आहे. त्यामध्ये भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी गंगाची झालेली निवड  ही अतिशय गौरवाची, अभिमानाची आत्मिक समाधानाची गोष्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *