
मुंबई ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे विविध शैक्षणिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन आणि केंब्रिज विद्यापीठ प्रेस अँड ॲसेसमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात विद्यार्थी आणि शिक्षकांची संख्या मोठी असून केंब्रिजकडे आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक कौशल्य आहे, या दोन घटकांच्या एकत्रीकरणामुळे राज्यातील शालेय शिक्षणाला जागतिक मान्यता मिळेल.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळविण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्या दिशेने महाराष्ट्राने प्रवास सुरू केला असून या करारामुळे तो अधिक फलदायी ठरणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
केंब्रिज हे शिक्षण क्षेत्रातील जगातील सर्वात मोठे आणि विश्वासार्ह नाव असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले की, केंब्रिजने विकसित केलेल्या पद्धती व अनुभवातून राज्यातील विद्यार्थ्यांना निश्चितच मोठा फायदा होईल. हा सामंजस्य करार हे पहिले पाऊल असून पुढे अजून मोठा प्रवास बाकी आहे. या प्रवासात महाराष्ट्र शासन केंब्रिजसोबत भागीदार राहणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावेळी राज्यमंत्री डॉ पंकज भोयर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.