जळगाव ः डॉ सच्चीदानंद मुनगंटीवार मेमोरियल महाराष्ट्र मिनी स्टेट सिलेक्शन बॅडमिंटन स्पर्धा चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली होती. या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत ओवी पाटील (चाळीसगाव) व श्रद्धा इंगळे (कराड) या दोघींनी १३ वर्षांखालील दुहेरी गटात विजय प्राप्त केला. त्यांनी सेमी फायनलमध्ये हेजल जोशी व स्पृहा जोशी मुंबई उपनगर या खेळाडूंना २१-१५ व २१-१४ ने हरवत अंतिम सामन्यासाठी आपली जागा निश्चित केली होती.
अंतिम सामन्यामध्ये मायरा गोराडिया व कनक जलानी मुंबई यांचा २१-१४ व २१-१५ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करत विजय नोंदवला. त्यांना सुवर्णपदक, ट्रॉफी, रोख रक्कम व प्रावीण्य प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. ओवीचे वडील अमोल पाटील हे चाळीसगाव येथील काकासाहेब पूर्णपात्रे शाळेत क्रीडा शिक्षक असून तेच तिचे प्रशिक्षक आहेत. ओवी पाटील व अमोल पाटील यांच्या भावी वाटचालीसाठी जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन व सचिव विनीत जोशी, जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे क्रीडा समन्वयक अरविंद देशपांडे व प्रशिक्षक किशोर सिंह यांनी शुभेच्छा दिल्या. जळगाव रेल्वे स्टेशनवर जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या प्रशिक्षक दीपिका ठाकूर यांच्यासह महिला खेळाडूंनी ओवीचा सत्कार केला.


