
डी ११ टी २० लीग क्रिकेट ः राहुल जोनवाल सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः डी स्पोर्ट्स प्रेझेंट्स डी ११ टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सामन्यात नाथ ड्रीप संघाने टीम एक्सएल संघावर ९५ धावांनी दणदणीत विजय साकारत आगेकूच कायम ठेवली. या लढतीत राहुल जोनवाल याने सामनावीर पुरस्कार संपादन केला.
रुफीट क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा होत आहे. नाथ ड्रीप संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत २० षटकात सात बाद १७३ अशी भक्कम धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना टीम एक्सएल संघ ११.२ षटकात नऊ बाद ७८ धावा काढू शकला. त्यामुळे नाथ ड्रीप संघाने ९५ धावांनी मोठा विजय साकारत आगेकूच केली.
या सामन्यात रमेश शिराळे याने ३४ चेंडूत ४७ धावा फटकावल्या. त्याने तीन चौकार व तीन उत्तुंग षटकार मारले. विश्वजित राजपूत याने ३५ चेंडूत ३६ धावा काढल्या. त्याने चार चौकार व एक षटकार मारला. राहुल जोनवाल याने १९ चेंडूत ३३ धावांचे योगदान दिले. त्याने दोन चौकार व दोन षटकार मारले.
गोलंदाजीत राहुल जोनवाल याने ४ षटकात केवळ सहा धावांच्या मोबदल्यात दोन गडी बाद केले. या अष्टपैलू कामगिरीमुळे राहुल जोनवाल याला सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला. अहमद बटोक याने २१ धावांत दोन गडी टिपले. विकास पवार याने २० धावांत दोन बळी घेतले.