
नंदुरबार येथे राज्यस्तरीय अक्वाथलॉन स्पर्धेची उत्साहात सांगता
नंदुरबार ः महाराष्ट्र ट्रायथलॉन संघटना व नंदुरबार जिल्हा ट्रायथलॉन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार शहरातील बाळासाहेब ठाकरे जलतरण तलाव येथे राज्यस्तरीय भव्य अक्वाथलॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधून खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विजेत्या खेळाडूंना बक्षीस वितरण समारंभात सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे या स्पर्धेतून राष्ट्रीय स्तरासाठी महाराष्ट्राचा संघ निवडण्यात येणार असून, राष्ट्रीय स्पर्धा ११ व १२ ऑक्टोबर रोजी भोपाळ येथे होणार आहेत.
बक्षीस वितरण समारंभास जिल्हाध्यक्ष व युवा नेते किरण रघुवंशी, बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष यशवर्धन रघुवंशी, मुख्याध्यापक संघाचे सचिव प्राचार्य पुष्पेंद्र रघुवंशी, राज्य ट्रायथलॉन संघटनेचे अध्यक्ष दयानंद कुमार, सचिव राजेंद्र निंबाळते, जिल्हा सचिव डॉ मयूर ठाकरे, तांत्रिक समितीचे अध्यक्ष अभय देशमुख, कमलेश नगरकर, तसेच क्रीडा मार्गदर्शक केंद्रातील अधिकारी बालाजी केंद्रे व सुनील भिसे उपस्थित होते.
या प्रसंगी अध्यक्ष किरण रघुवंशी म्हणाले की, “खेळातून मिळणाऱ्या संधी जीवनाला योग्य दिशा देतात. त्यामुळे खेळाडूंनी सातत्याने विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवत राहावे.”
स्पर्धा यशस्वी आयोजनासाठी डॉ मयूर ठाकरे, राहुल काळे, अमोल भोयर, रंजीत गावित, अमित गावित यांनी परिश्रम घेतले. तसेच जगदीश बच्छाव, संदीप पाटील, भटू पाटील, भरत चौधरी, जगदीश वंजारी, राजेश्वर चौधरी यांनी मोलाचे योगदान दिले.
स्पर्धेचा निकाल
१० वर्षाखालील गट मुले : प्रथम मोमीन मोहम्मद (ठाणे), द्वितीय आर्य धोत्रे (पुणे). मुली : प्रथम त्विशा खैरणार (नाशिक), द्वितीय जान्हवी केंगर (सोलापूर).
१२ वर्षांखालील गट मुले : प्रथम हर्षा पाटील (पुणे) द्वितीय हिमांशू नरखेडे (अमरावती). मुली : प्रथम पायल पाटील (पुणे) द्वितीय श्रीनीथी एस (ठाणे).
१३ ते १५ वर्षे गट मुले : प्रथम वरून राज डोंगळे (पुणे), द्वितीय मेघराज डोंगळे (पुणे). मुली : प्रथम ऋतुजा जाळे (पुणे) द्वितीय इश्वरी काळमेघ (वर्धा).
१६ ते १८ वर्षे गट मुले ः प्रथम अश्विन एस (ठाणे) द्वितीय जय लवटे (पुणे). मुली : प्रथम श्रावणी जगताप (पुणे) द्वितीय गौरी शिंगाडे (पुणे).
ओपन गट पुरुष : प्रथम अंगत इंगळेकर (पुणे) द्वितीय पार्थ मिरगे (पुणे). महिला : प्रथम स्नेहल जोशी (नागपूर) द्वितीय सिद्धी धनवटे (पुणे).
५० वर्षांवरील गट ः प्रथम नरेंद्र पाटील.