बुद्धिबळाने देशाची वेगळी ओळख, आता वाढवण्याचे काम प्रशिक्षकांचे

  • By admin
  • September 19, 2025
  • 0
  • 91 Views
Spread the love

फिडे ट्रेनर्सच्या तीन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मनोज एरंडे यांचे प्रतिपादन

पुणे ः भारतीय बुद्धिबळाच्या विकासाला चालना देण्यासाठी, जास्तीत जास्त चांगले बुद्धिबळपटू घडविण्यासाठी अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेच्या वतीने आयोजित तीन दिवसीय फिडे ट्रेनर्स कार्यशाळेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. 

या कार्यशाळेत देशभरातून ७ राज्यांतील ४५ अधिक अनुभवी आणि नवोदित बुद्धिबळ प्रशिक्षकांनी सहभाग घेतला. यामध्ये आंतरराष्ट्रीय मास्टर मुबैशाह शेख, प्रतिष्ठित खेळाडू व प्रशिक्षक डब्ल्यूआयएम मृणालिनी कुंटे यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. 

एआयसीएफ व पुणे डिस्ट्रिक्ट चेस सर्कल (पीडीसीसी), महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना (एमसीए) यांच्या वतीने आयोजित ही कार्यशाळा भांडारकर रस्त्यावरील मयूर हॉल येथे सुरू आहे. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या सहकार्याने आणि जागतिक बुद्धिबळ महासंघाच्या (फिडे) प्रशिक्षक आयोगाच्या देखरेखी ही कार्यशाळा सुरू आहे. नवीन प्रशिक्षक प्रणाली, प्रशिक्षकांची भूमिका, त्यांच्यासमोरील आव्हाने, कर्णधाराची भूमिका अशा अनेक विषयांवर तज्ज्ञांकडून उपस्थित प्रशिक्षकांना मार्गदर्शन मिळणार आहे.

या कार्यशाळेचे उद्‌घाटन जलतरणमधील छत्रपती पुरस्कार विजेते मनोज एरंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आयआरएस किरण शिंदे, ध्यानचंद पुरस्कार विजेते ग्रँडमास्टर अभिजित कुंटे, सहायक प्रशिक्षक एन के मिश्रा, महाराट्र बुद्धिबळ संघटनेचे सचिव निरंजन गोडबोले, पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश कुंटे, सचिव राजेंद्र शिदोरे, मनीष कुमार, दीप्ती शिदोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटन प्रसंगी मनोज एरंडे म्हणाले की, खेळाला एक चेहरा आवश्यक असतो. भारतासाठी हा बुद्धिबळात हा चेहरा विश्वनाथन आनंद, अभिजित कुंटे यांच्यासारख्या खेळाडूंमुळे मिळाला. आता तो वारसा डी गुकेश, अर्जुन एरिगेसी, दिव्या देशमुख चालवत आहेत. तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करणा-यासाठी असे चेहरे, त्यांची कामगिरी प्रेरणादायी ठरत असते. सध्या बुद्धिबळातील अव्वल दहा मधील पाच खेळाडू भारताचे आहेत. त्यामुळे बुद्धिबळाने आपल्या देशात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ही ओळख आणखी वाढवण्याचे काम तुमच्यासारख्या प्रशिक्षकांना करायचे आहे.

तळागाळापर्यंत पोहोचून हे कार्य घडू शकते. तुम्हाला स्वत:च्या कामगिरीवर अभिमान असायला हवा. कारण, प्रशिक्षक म्हणून तुम्ही कोणाची तरी कारकीर्द घडवत आहात, हे कायम लक्षात ठेवा. खेळाडूंच्या यशाचा अभिमान जसा, आई-वडिलांना असतो, तसाच तो प्रशिक्षकालाही असतो. फक्त संयम राखायला शिका. सर्वच खेळाडू सारखे नसतात. त्यामुळे खेळाडू घडविताना झटपट निकालाची अपेक्षा ठेऊ नका.

किरण शिंदे म्हणाले की, सध्या देशात बुद्धिबळाची क्रांती झाली आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. महाराष्ट्रातही अनेक ग्रँडमास्टर तयार होत आहेत. याचे श्रेय तुमच्यासारख्या सर्व प्रशिक्षकांना जाते. कारण, त्यांना घडविण्यात प्रशिक्षकाची भूमिका सर्वांत महत्त्वाची असते. तुम्ही सहा वर्षांच्या मुलाला शिकवा किंवा ग्रँडमास्टरला शिकवा, तुमची भूमिका सारखीच असायला हवी. बुद्धिबळ हा पूर्णपणे वेगळा खेळाडू आहे. या खेळातील तुम्ही प्रशिक्षक आधारस्तंभ आहात. खेळाडूंना बुद्धिबळातील नवनवीन चाली नक्की शिकवा. मात्र, मानसिकदृष्ट्या तो कणखर कसा होईल, हेही बघा.  
 
बुद्धिबळ खेळाच्या वाढीसाठी नवोदित स्तरांवरील प्रशिक्षकांची भूमिका अधिक महत्वाची असते. पहिला प्रशिक्षक हा खेळाडूंच्या कायमचा लक्षात राहत असतो, असे ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे यांनी नमूद केले. या कार्यशाळेचा उद्देश प्रशिक्षकांचे व्यावहारिक ज्ञान, त्यांना खेळाडूंची कामगिरी व त्यांच्या बद्दल असलेली , खेळातील त्यांच्या स्वतःच्या कामगिरीच्या आधारे परीक्षण करणे.

प्रशिक्षकांना बुद्धिबळातील नवीनतम रणनीती, शिकवण्याचे तंत्र आणि खेळाडूंच्या मानसिक तयारीबाबत मनीषकुमार यांनी मार्गदर्शन केले. तर, एमसीए सचिव निरंजन गोडबोले यांनी आभार मानले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *