
नवी दिल्ली ः भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूचा चायना मास्टर्स सुपर ७५० मध्ये महिला एकेरीच्या क्वार्टरफायनलमध्ये पराभव झाल्याने तिच्या स्पर्धेतील मोहिमेचा शेवट झाला. सिंधूचा सामना क्वार्टरफायनलमध्ये सध्याची जागतिक नंबर १ दक्षिण कोरियाची शटलर अन से यंगशी झाला, हा सामना तिने फक्त ३८ मिनिटांत जिंकला.
पी व्ही सिंधू हाँगकाँग ओपनच्या पहिल्या फेरीत बाहेर पडली. त्यामुळे चाहत्यांना चायना मास्टर्स स्पर्धेत चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. पी व्ही सिंधूने राउंड ऑफ ३२ आणि प्री-क्वार्टरफायनलमध्ये दमदार कामगिरी करून क्वार्टरफायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले, परंतु तिला अन से यंगविरुद्ध सरळ सेटमध्ये पराभव पत्करावा लागला. या सामन्यात पीव्ही सिंधू पहिल्या सेटमध्ये १४-२१ आणि दुसऱ्या सेटमध्ये १३-२१ असा पराभव पत्करावा लागला. जागतिक नंबर एक अॅन से यंगविरुद्धच्या या सामन्यात पी व्ही सिंधू पूर्णपणे दबावाखाली दिसली. सिंधूने आतापर्यंत अन से यंगविरुद्ध एकूण आठ सामने खेळले आहेत, त्यातील सर्व सामने गमावले आहेत.
भारताची नंबर वन पुरुष दुहेरी जोडी, सात्विकसाईराज रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी हाँगकाँग ओपननंतर चायना मास्टर्समध्ये उत्कृष्ट कामगिरी करत क्वार्टरफायनलमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. सात्विक आणि चिराग आता चीनच्या रेन झिंग यू आणि झाई हाओनान यांच्याशी सामना करतील. जर सात्विक आणि चिराग यांनी हा सामना जिंकून उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के केले तर त्यांचा सामना लिओ रॉली कार्नांडो आणि बागास मौलाना किंवा आरोन चिया आणि सोह वूई यिक यांच्याशी होईल. हाँगकाँग ओपन २०२५ मध्ये, सात्विक-चिराग जोडी अंतिम फेरीत पोहोचली परंतु चिनी जोडीविरुद्ध सामना हरली.