
फलंदाजी, गोलंदाजीत ओमानची दमदार कामगिरी; अर्शदीप सिंग १०० बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज
अबु धाबी : आशिया कप स्पर्धेत शेवटचा साखळी सामना खेळताना भारतीय संघाने ओमान संघावर २१ धावांनी विजय नोंदवला. भारताचा हा २५० वा टी २० सामना होता. ओमान संघाने अपेक्षेपेक्षा अधिक कडवी झुंज भारतीय संघाला दिली. भारताचा सुपर फोरमधील पहिला सामना रविवारी पाकिस्तान संघाशी होणार आहे.
भारतीय संघाने ओमान संघासमोर विजयासाठी १८९ धावांचे आव्हान ठेवले. या धावसंख्येचा पाठलाग करताना जतिंदर सिंग आणि आमिर कलीम या सलामी जोडीने दमदार फलंदाजी करत ८.३ षटकात ५६ धावांची भागीदारी केली. भारताच्या वेगवान व फिरकी गोलंदाजांचा चांगला सामना करत या सलामी जोडीने भारतीय कर्णधार समोर चांगलाच पेच निर्माण केला. शेवटी कुलदीपने ही जोडी फोडली. जतिंदरच्या बॅटला चेंडू लागून स्टंपवर आदळला. त्याने ३३ चेंडूत ३२ धावा काढल्या. त्यात पाच चौकारांचा समावेश आहे.

आमिर कलीम व हम्माद मिर्झा यांनी शानदार अर्धशतके ठोकत दुसऱ्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी केली. हर्षित राणाने कलीमला ६४ धावांवर बाद करुन संघाला मोठा दिलासा दिला. त्याने दोन षटकार व सात चौकार मारले. हम्माद मिर्झा याने ३३ चेंडूत आक्रमक ५१ धावा फटकावल्या. त्याने दोन षटकार व पाच चौकार मारले. विनायक शुक्लाला बाद करुन अर्शदीप सिंग याने टी २० क्रिकेटमध्ये १०० वा बळी घेतला. अशी कामगिरी करणारा अर्शदीप हा पहिला भारतीय गोलंदाज बनला आहे. ओमानने २० षटकात चार बाद १६७ धावा काढल्या. त्यांना २१ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारताकडून हार्दिक पंड्या (१-२६), अर्शदीप सिंग (१-३७), हर्षित राणा (१-२५), कुलदीप यादव (१-२३) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

भारत ८ बाद १८८
भारताने ओमानविरुद्धच्या पहिल्या डावात २० षटकात ८ बाद १८८ धावा केल्या. आशिया कप गटातील हा शेवटचा सामना होता आणि संजू सॅमसनने टीम इंडियासाठी सर्वाधिक ५६ धावा केल्या. अभिषेक शर्माने नेहमीप्रमाणे २५३ च्या धमाकेदार स्ट्राईक रेटने फलंदाजी करत भारतीय संघाला धमाकेदार सुरुवात दिली. शाह फजल ओमानसाठी सर्वात प्रभावी गोलंदाज ठरला. त्याने त्याच्या चार षटकांमध्ये फक्त २३ धावा दिल्या आणि चार विकेट्स घेतल्या.
भारतीय संघाने केलेल्या १८८ धावा ही आशिया कप २०२५ मधील संयुक्त सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी, अफगाणिस्तानने या स्पर्धेत हाँगकाँगविरुद्ध १८८ धावा केल्या होत्या.
अभिषेक शर्माचे वादळ, संजूचे अर्धशतक
अभिषेक शर्मा संपूर्ण आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाला धमाकेदार सुरुवात देत आहे. ओमानविरुद्धच्या सामन्यात त्याने १५ चेंडूत ३८ धावा केल्या, ज्यामध्ये पाच चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. त्याचा स्ट्राईक रेट २५३ पेक्षा जास्त होता. शुभमन गिलने लक्षणीय कामगिरी केली नाही आणि तो फक्त ५ धावा करून क्लीन बोल्ड झाला.
संजू सॅमसनने ५५ धावा केल्या, पण त्याचा डाव फक्त १२४ च्या स्ट्राईक रेटने झाला. हार्दिक पंड्या फक्त एका धावेवर दुर्देवीरित्या धावबाद झाला. दरम्यान, संजू सॅमसन आणि अक्षर पटेल यांनी ४५ धावांची महत्त्वाची भागीदारी केली. पटेलने १३ चेंडूत २६ धावा केल्या. तिलक वर्मानेही शेवटच्या षटकांमध्ये १८ चेंडूत २९ धावांचे योगदान दिले.
कर्णधार सूर्यकुमार यादव सहसा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो, परंतु ओमानने टीम इंडियाचे आठ बळी घेतले असूनही, कर्णधार सूर्यकुमार फलंदाजीला आला नाही. ओमान हा खालच्या क्रमांकाचा संघ आहे, परंतु सुपर ४ टप्प्यात भारताला लवकरच कठीण सामन्यांना सामोरे जावे लागू शकते. कदाचित म्हणूनच कर्णधार सूर्यकुमारने इतर खेळाडूंना फलंदाजी करण्याची परवानगी देण्यासाठी स्वतःला मागे ठेवण्याचा निर्णय घेतला.
भारताचा २५० वा टी २० सामना
ओमानविरुद्धचा सामना हा भारतीय संघाचा टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील २५० वा सामना आहे. भारतीय संघ २५० किंवा त्याहून अधिक टी २० सामने खेळणारा दुसरा संघ बनला आहे. पाकिस्तानी संघाने आतापर्यंत एकूण २७५ टी २० सामने खेळले आहेत. आता, भारतीय संघाने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. विशेष म्हणजे भारताचा ओमान संघाविरुद्ध हा पहिलाच टी २० सामना आहे. भारतीय संघाने आतापर्यंत एकूण २४९ टी २० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, त्यापैकी १६६ जिंकले आहेत आणि ७१ गमावले आहेत. सहा सामने बरोबरीत सुटले आहेत आणि सहा सामने अनिर्णित राहिले आहेत.