
अबु धाबी ः भारतीय क्रिकेट संघाने टी २० आशिया कप स्पर्धेच्या त्यांच्या शेवटच्या गट टप्प्यातील सामन्यात ओमानचा २१ धावांनी पराभव केला. ओमानने भारताला कठीण लढत दिली, पण शेवटी भारताने विजय नोंदवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना १८८ धावा केल्या. ओमानला फक्त १६७ धावा करता आल्या. सामन्यात फक्त एक विकेट घेत अर्शदीप सिंगने महत्त्वपूर्ण टप्पा गाठला.
अर्शदीप सिंगने ओमानविरुद्धच्या सामन्याच्या २० व्या षटकात विनायक शुक्लाची विकेट घेतली. यासह त्याने टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० विकेट्स पूर्ण केल्या. तो टी २० क्रिकेटमध्ये १०० विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला. त्याच्या आधी कोणत्याही भारतीयाने ही कामगिरी केलेली नव्हती.
अर्शदीप सिंगने २०२२ मध्ये भारतीय संघासाठी टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि तेव्हापासून तो भारतीय गोलंदाजी आक्रमणात एक महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने भारतीय संघासाठी ६४ टी २० सामन्यांमध्ये एकूण १०० बळी घेतले आहेत. त्याची सर्वोत्तम कामगिरी ९ धावांत चार बळी ही होती.