ठाणे जिल्हाध्यक्ष प्रमोद वाघमोडे यांची मागणी
मुंबई : टीएआईटी २०२५ चा निकाल जाहीर झाल्यानंतरही शारीरिक शिक्षण शिक्षक (क्रीडा) पदे अद्याप रिक्त असून राज्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर त्याचा गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळे ही रिक्त पदे लवकरात लवकर भरावीत अशी मागणी महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष प्रमोद वाघमोडे यांनी केली आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०, शासन निर्णय दिनांक १५ मार्च २०२४ तसेच शासन निर्णय दिनांक २१ ऑगस्ट २०२५ मध्ये शारीरिक शिक्षण शिक्षक नेमणुकीसंदर्भात स्पष्ट तरतुदी असून, प्रत्येक २५० विद्यार्थ्यांमागे एक शारीरिक शिक्षण शिक्षक असणे बंधनकारक आहे. तरीही मागील २० वर्षांपासून जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, शासकीय आश्रमशाळा तसेच समाजकल्याण विभागातील शाळांमध्ये या पदांची भरती झालेली नाही. परिणामी बीपीएड व एमपीएड पदवीधर उमेदवार बेरोजगार असून, ग्रामीण व शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षण व शारीरिक शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.
सध्या सीबीएसई व इंग्रजी माध्यम शाळांमध्ये शारीरिक शिक्षण शिक्षकांची पदे पूर्ण क्षमतेने भरलेली असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये ही पदे रिक्त ठेवणे अन्यायकारक असल्याचे शिक्षक संघटनांनी स्पष्ट केले आहे.
प्रमुख मागण्या
१. शारीरिक शिक्षण शिक्षक (क्रीडा) पदांची पवित्र पोर्टलद्वारे स्वतंत्र गट/कोड करून भरती करावी.
२. “शाळा तिथे ते शिक्षक” या तत्वानुसार शारीरिक शिक्षण शिक्षकांची नेमणूक तातडीने करावी.
३. जिल्हा परिषद केंद्र शाळा, माध्यमिक शाळा, महानगरपालिका व नगरपालिकांच्या शाळा, शासकीय आश्रमशाळा तसेच समाजकल्याण विभागातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील सर्व शारीरिक शिक्षण शिक्षकांची पदे पवित्र पोर्टल मार्फत भरावीत.
४. पवित्र पोर्टल टीएआईटी भरती प्रक्रियेत समाविष्ट करून तातडीने कार्यवाही करावी.
शारीरिक शिक्षण शिक्षक पदांची तातडीने भरती न झाल्यास विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व सांस्कृतिक विकासास मोठा अडथळा निर्माण होईल. त्यामुळे राज्य शासनाने या मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्वरित निर्णय घ्यावा, अशी शिक्षक महासंघाची ठाम भूमिका आहे असे मुंबई विभाग संपर्क प्रमुख प्रमोद वाघमोडे यांनी सांगितले.