
नव्या बॅडमिंटन कोर्टवर रंगत आहे पहिली बॅडमिंटन स्पर्धा
छत्रपती संभाजीनगर ः एमपीपी स्पोर्ट्स पार्कतर्फे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभला आहे. विविध गटांमध्ये तब्बल २०० खेळाडूंमध्ये विजेतेपद मिळवण्यासाठी चुरस पहावयास मिळत आहे.
एमपीपी स्पोर्ट्स पार्क येथे उभारण्यात आलेल्या नवीन आधुनिक बॅडमिंटन कोर्टवर बॅडमिंटन स्पर्धा प्रथमच होत आहे. महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे सरचिटणीस सिद्धार्थ पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ सचिन देशमुख, माणिकचंद पहाडे महाविद्यालयाचे प्राचार्य के एस राव यांची प्रमुख उपस्थिती होती. एमपीपी स्पोर्ट्स पार्कचे संचालक अॅड संकर्षण जोशी आणि अॅड गोपाल पांडे यांची विशेष उपस्थिती होती.
या स्पर्धेत एकूण २०० खेळाडूंनी विविध वयोगटात सहभाग घेतला आहे. शहराच्या सर्व भागातून खेळाडूंनी सहभाग घेतला असून स्पर्धेचा उर्वरित कार्यक्रम २१ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी चार ते सात या वेळेत होणार आहे. या स्पर्धेतील सर्व बाद फेरीचे सामने व अंतिम सामने रविवारी रंगणार आहेत.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी हिमांशू गोडबोले, अतुल कुलकर्णी, रुद्राक्ष पांडे, अनिरुद्ध पांडे, शिवम पांडे, विश्वेश जोशी, शिवाजी मचले, अंकुश तळेगावकर, अक्षय महाजन यांनी विशेष परिश्रम घेतले. या स्पर्धेत स्वरुप पवार याने अस्मित टाक याला ३०-२२ अशा फरकाने पराभूत केले. साकार कुलकर्णी याने हर्ष टेपले याला ३०-२४ असे पराभूत केले. माधव बियानी याने राघव देसाईवर ३०-२८ असा विजय नोंदवला. तान्या नरवडे हिने वेदिका आराध्ये हिला ३०-२३ असे पराभूत केले. नंदिनी गाडेकर हिने गोडबोलेला ३०-२६ असे पराभूत केले.