
डी ११ टी २० लीग क्रिकेट ः पाच विकेट घेणारा सलीम पठाण सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः डी स्पोर्ट्स प्रेझेंट्स डी ११ टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यात इथिकल क्रिकेट अकादमी संघाने साऊथ वेस्ट मीडिया संघावर १२४ धावांनी दणदणीत विजय नोंदवला. या लढतींमध्ये सलीम पठाण याने सामनावीर पुरस्कार संपादन केला.

रुफीट क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा होत आहे. इथिकल क्रिकेट अकादमीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात चार बाद १९२ अशी भक्कम धावसंख्या उभारुन सामन्यावर वर्चस्व गाजवले. या धावसंख्येच्या प्रत्युत्तरात साऊथ वेस्ट मीडिया संघ ११.३ षटकात अवघ्या ६८ धावांत सर्वबाद झाला. इथिकल अकादमीने १२४ धावांनी सामना जिंकला.
या सामन्यात एस भारती याने ३९ चेंडूंत ७८ धावांची स्फोटक अर्धशतकी खेळी केली. त्याने पाच चौकार व सात टोलेजंग षटकार ठोकून सामना गाजवला. राज सांबरे याने २५ चेंडूत ३४ धावा फटकावल्या. त्याने चार चौकार मारले. साहिल तडवी याने एक षटकार व दोन चौकारांसह ३३ धावांची वेगवान खेळी साकारली.
गोलंदाजीत सलीम पठाण याने घातक गोलंदाजी करत ३६ धावांत पाच विकेट घेऊन सामना गाजवला. या प्रभावी कामगिरीमुळे तो सामनावीर ठरला. मयूर वैष्णव याने ५ धावांत तीन गडी बाद केले. राज सांबरे याने १० धावांत एक बळी घेऊन अष्टपैलू कामगिरी बजावली.