
पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या हस्ते उद्घाटन
छत्रपती संभाजीनगर ः पोलिस आयुक्तालय, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या ३१व्या घटक पोलिस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
पोलिस आयुक्त प्रवीण पवार आणि पोलिस उपायुक्त शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली देवगिरी क्रीडा मैदानावर घटक पोलीस क्रीडा स्पर्धेला प्रारंभ झाला. या स्पर्धेत पोलिस आयुक्तालयातील शहर विभाग, पोलिस मुख्यालय, छावणी विभाग, सिडको विभाग, उस्मानपुरा विभाग या पाच विभागांनी सहभाग नोंदवला आहे.
सर्व विभागातील खेळाडूंच्या गटाने उत्कृष्ट पथसंचलन केले. सदर पथसंचलनाचे नेतृत्व पोलिस मुख्यालयाचे हॉकीपटू आजम शेख यांनी केले. मशाल धावक बाबासाहेब मंडलिक व स्वाती गाडेकर यांनी प्रमुख अतिथींना मशाल सुपूर्द केली. प्रमुख अतिथी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी ज्योत पेटवली आणि त्यानंतर सर्व खेळाडूंचा शपथविधी झाला.
उद्घाटनाच्या वेळी व्हॉलीबॉलचा सामना पोलिस मुख्यालय विरुद्ध शहर विभाग असा झाला. त्यामध्ये मुख्यालयाचा संघ विजयी झाला. सुनील जाधव, अंबादास राठोड, मिलिंद भंडारे, अखिल मोमीन, आसिफ शेख, सुभाष बकले, राजू सुरडकर, जमिल शेख, जनार्दन जाधव या खेळाडूंनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले.
यावेळी प्रमुख अतिथी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. पोलिस उपायुक्त शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांनी प्रास्ताविक केले तर सहाय्यक पोलिस आयुक्त प्रशासन सुभाष भुजंग यांनी आभार प्रदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख असिफ यांनी केले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन पोलिस उपायुक्त शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रल्हाद राठोड, सतीश मुत्याल, नारायण पुरके, क्रीडा प्रमुख राजेंद्र घुनावत व सर्व वरीष्ठ खेळाडूंनी केले. यावेळी संभाजी पवार, गजानन कल्याणकर, गणेश ताठे, अतुल येरमे, शिवचरण पांढरे तसेच गोकुळ कुत्तरवाडे, राजेंद्र चौधरी, संदीप पाटील यांनी सहकार्य केले.