
दुबई : बांगलादेश संघाने दमदार फलंदाजी करत चुरशीच्या सामन्यात श्रीलंका संघावर चार विकेट राखून विजय नोंदवत आशिया कप स्पर्धेतील सुपर फोरचा पहिला सामना जिंकला.

श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकात सात बाद १६८ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. त्यात शनाका (नाबाद ६४), पथुम निस्सांका (२२), कुसल मेंडिस (३४), असलंका (२१), कुसल परेरा (१६) यांनी आपले योगदान दिले. बांगलादेशकडून मुस्तफिजूर (३-२०), मेहेदी हसन (२-२५) यांनी प्रभावी गोलंदाजी केली.
बांगलादेश संघासमोर विजयासाठी १६९ धावांचे आव्हान होते. तन्झिद हसन तमीम (०) लवकर बाद झाल्यानंतर हा सामना चुरशीचा होईल अशी अपेक्षा होती. मात्र, सैफ हसन (६१) व तौहिद ह्रदयॉय यांनी स्फोटक अर्धशतके ठोकून सामना एकतर्फी बनवला. हसनने चार षटकार व दोन चौकारांसह ६१ धावा फटकावल्या. ह्रदयॉय याने आक्रमक अर्धशतक साजरे करुन संघाचा विजय निश्चित केला. त्याने ३७ चेंडूत ५८ धावा काढल्या त्याने चार चौकार व दोन षटकार मारले. बांगलादेशने १९.५ षटकात सहा बाद १६९ धावा फटकावत चार विकेटने सामना जिंकला. श्रीलंकेकडून वानिंदू हसरंगा (२-२२), दासुन शनाका (२-२१) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.