राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये महाराष्ट्र चॅम्पियन

  • By admin
  • September 21, 2025
  • 0
  • 57 Views
Spread the love

मुंबई संघाला उपविजेतेपद

निफाड (विलास गायकवाड) ः भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशन व उत्तर प्रदेश टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि मथुरा जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सातवी राष्ट्रीय १७ वर्षांखालील टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र संघाने आपला दबदबा कायम ठेवत विजेतेपद पटकावले. मुंबई संघाने उपविजेतेपद संपादन केले. 

मथुरा येथील हार्शी राघव क्रिकेट मैदानावर राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धा उत्साहाने संपन्न झाली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक महाराष्ट्र, द्वितीय क्रमांक मुंबई, तृतीय क्रमांक झारखंड, चतुर्थ क्रमांक तेलंगणा या संघांनी मिळवला.

या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेट फेडरेशनचे अध्यक्ष कन्हैया गुज्जर तसेच भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या महासचिव मीनाक्षी गिरी, महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या महिला अध्यक्ष धनश्री गिरी आदी मान्यवर उपस्थित होते.

या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये एकूण १५ संघांनी सहभाग नोंदवला होता. टेनिस क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना महाराष्ट्र विरुद्ध मुंबई असा झाला. त्यामध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी लक्षवेधक कामगिरी करत विजेतेपद मिळवले. मुंबई संघाने चांगले प्रयत्न करून या अंतिम सामन्यात चांगली चुरस निर्माण करून उपविजेता ठरला. तृतीय क्रमांक झारखंड ,चतुर्थ क्रमांक तेलंगणाला मिळाला.
     
महाराष्ट्र संघाकडून हर्षद डवले, धीरज ठाकरे, विघ्नेश मढवी, सिद्धेश पारखे, अजित विश्वकर्मा, संगम राजभर, संदेश इंगळे, प्रेम कदम, आयुष खरात, सिद्धेश गोलांबडे, गैरिज माळी, वेदांत पडोळ, सर्वेश झुटे, अजय सुतार, तुषार करडे, गीतराज कुंभार यांनी चांगली कामगिरी केली व महाराष्ट्र संघाला विजेतेपद मिळवून दिले. तसेच मुंबई संघाकडून सुबोध मायनाक, आदित्य पवार, मयुरेश लाड, राजस चव्हाण, ओम संकपाळ, वरद माने, तुषार लोंढे, रोनित पवार, अर्णव पांचाळ, आरूष पिंपळे, विक्रम दोंदले, अर्जुन कदम, हर्षल सानप, सम्राट तोरवे, आदित्य गोडकर या सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ करत मुंबई संघाला उपविजेतेपद मिळवून दिले.

या स्पर्धेतून उत्कृष्ट खेळाडूंची आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे. या स्पर्धेतून ज्या खेळाडूंची निवड होणार आहे ते खेळाडू भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धा डिसेंबर महिन्यामध्ये नेपाळ येथे होणार आहे.

महाराष्ट्र संघाला विजेतेपद व मुंबई संघाला द्वितीय पारितोषिक आणि सर्वोत्कृष्ट फलंदाज आदित्य पवार, सर्वोत्कृष्ट गोलंदाज हर्षद दावळे, मालिकावीर हर्षद दावळे यांना मिळाल्याबद्दल महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या सचिव मीनाक्षी गिरी, वूमन डायरेक्टर धनश्री गिरी, महाराष्ट्र टेक्निकल डायरेक्टर स्वप्निल ठोमरे, विलास गिरी व नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड, दर्शन थोरात या सर्वांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच संघाच्या विजयासाठी मार्गदर्शक म्हणून कुणाल हळदणकर, धनश्री गिरी, लखन देशमुख, विजय उंबरे, सोमा बिरादार या सर्वांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *