
शालेय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा
नागपूर ः आंतर शालेय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत स्कूल ऑफ स्कॉलर्स, दिल्ली पब्लिक स्कूल, समर्थ हायस्कूल या संघांनी विजेतेपद पटकावले. दिल्ली पब्लिक स्कूल संघाने दुहेरी मुकुट संपादन केला.
जिल्हा क्रीडा कार्यालय नागपूर यांनी आयोजित केलेली नागपूर जिल्हा ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ईदगाह मैदान, जाफर नगर येथे यशस्वीरित्या पार पडली. या स्पर्धेत विविध वयोगटातील खेळाडूंनी उत्साही सहभाग घेतला होता आणि एक रोमांचक स्पर्धा पहावयास मिळाली.
१७ वर्षांखालील मुलींच्या गटात स्कूल ऑफ स्कॉलर्स, बेलतरोडी संघाने अंतिम फेरीत भालेराव हायस्कूलला हरवून विजेतेपद पटकावले. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात दिल्ली पब्लिक स्कूल (डीपीएस) नागपूरने स्कूल ऑफ स्कॉलर्सवर रोमांचक विजय मिळवत विजेतेपद पटकावले.
१९ वर्षांखालील मुलींच्या गटात समर्थ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज रामटेकने ट्रॉफी जिंकली. १९ वर्षांखालील मुलांच्या गटात दिल्ली पब्लिक स्कूल लावा संघाने अंतिम फेरीत प्रभावी कामगिरी करत विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेचे सुरळीत आयोजन करण्यात आले. यशस्वी आयोजनासाठी डॉ मोहम्मद बाबर, पूजा चौधरी, डॉ बाबूलाल धोत्रे, प्रतीक तवके, मोहम्मद झयान, प्रियंका काटे, साक्षी गौर, साक्षी काकडे, मयूर, सतीश भालेराव, अमित शुक्ला आणि इतर अनेकांनी पुढाकार घेतला होता.