
नागपूरमध्ये युवा व क्रीडा संवाद कार्यक्रम उत्साहात
नागपूर : राज्यातील नवीन क्रीडा धोरण राबविण्याच्या दृष्टीने नागपूर येथे युवा व क्रीडा संवाद कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी खेळाडू, संघटक, प्रशिक्षक यांच्याशी थेट संवाद साधला.
विभागीय क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय हॉलमध्ये युवा व क्रीडा संवाद कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी भूषविले.
या संवाद उपक्रमात सहा जिल्ह्यांतील विविध क्रीडा संघटनांचे अध्यक्ष, सचिव, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू, क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक, पालक, क्रीडा पत्रकार तसेच पुरस्कारप्राप्त युवा व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा सहसंचालक सुधीर मोरे यांनी केले. सुधीर मोरे यांनी सांगितले की, नागपूर विभागातून या उपक्रमाची सुरुवात झाली असून राज्यातील सर्व आठ विभागांत असेच कार्यक्रम आयोजित केले जातील. यामधून मिळालेल्या सूचनांचा अभ्यास करून अंतिम क्रीडा धोरणात त्यांचा समावेश करण्यात येईल. त्यांनी क्रीडा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहितीही उपस्थितांना दिली.
संवादाच्या दरम्यान गडचिरोली जिल्ह्यापासून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रत्येक जिल्ह्यातील प्रतिनिधींनी थेट मंत्र्यांसमोर आपल्या समस्या व सूचना मांडल्या. अनेक मुद्द्यांवर मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. विशेषतः क्रीडा विभागातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात त्यांनी स्पष्ट केले की, जवळपास एक हजार जागा लवकरच भरल्या जाणार आहेत. काही मुद्द्यांवर शासन निर्णय लवकरच घेण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.
कार्यक्रमास आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू दिया देशमुख व अर्जुन पुरस्कार विजेते विजय मुनिराव यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा अधिकारी माया दुबळे यांनी केले. क्रीडा उपसंचालक पल्लवी धात्रक यांनी आभार मानले.