आर्य क्रीडा मंडळाच्या अध्यक्षपदी श्रीकांत वाड यांची निवड

  • By admin
  • September 22, 2025
  • 0
  • 11 Views
Spread the love

ठाणे ः ठाण्यातील एक अतिशय जुन्या व ठाण्याच्या क्रीडा क्षेत्रात अतिशय प्रसिद्ध असणाऱ्या आर्य क्रीडा मंडळ या विख्यात क्रीडा संस्थेच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ बॅडमिंटन प्रशिक्षक, खेळाडू व कार्यकर्ते श्रीकांत वाड यांची बिनविरोध निवड झाली आहे.

सदर संस्था १९२७ साली स्थापन झाली असून पुढील वर्षात ही संस्था शताब्दी वर्षात पदार्पण करीत आहे. आर्य क्रीडा मंडळातून आजवर अनेक जिल्हा राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार झाले असून विशेषतः जलतरण, शरीर सौष्ठव, ॲथलेटिक्स, बॅडमिंटन व जिम्नॅस्टिक या खेळांमध्ये या संस्थेतील खेळाडूंनी भरीव कामगिरी केली आहे. नऊ दशकांची दैदिप्यमान क्रीडा परंपरा असणाऱ्या संस्थेची गावदेवी मैदानात स्वतःची भव्य इमारत आहे.

श्रीकांत वाड यांच्या बरोबरच नऊ जणांची कार्यकारिणी देखील बिनविरोध निवडून आली. या कार्यकारिणीत अशोक सपकाळ (उपकार्याध्यक्ष), सुबीर कोरडे (सचिव), तेजस घोसाळकर (सहसचिव), महेश भोईर (खजिनदार), राजीव गणपुले (सदस्य), सतीश शबराय (सदस्य), राजेश दिघे (सदस्य), कावेरी सावे (सदस्य) यांचा समावेश आहे.

पदग्रहण केल्यानंतर सभासदांना संबोधित करताना आपल्या पाहिल्याच संबोधनात श्रीकांत वाड यांनी आर्य क्रीडा मंडळाला पूर्वीचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करण्यासाठी कटीबद्ध असल्याचे नमूद केले. तसेच भविष्यात संस्थेच्या सर्व अँक्टिव्हिटीज पुन्हा एकदा सर्वांच्या सहकार्याने जोमाने सुरू करण्याचा मनोदय प्रकट केला. १००व्या वर्षात आर्य क्रीडा मंडळाला ठाण्याची आग्रगण्य क्रीडासंस्था म्हणून पुन्हा एकदा नावारूपाला आणण्याची जबाबदारी सर्व सभासदांची व कार्यकारिणीची आहे असे जेष्ठ सभासद वेंकटेश कुलकर्णी यांनी विशेष नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *