
महिला गटात एटाना बोनमतीने इतिहास रचला
नवी दिल्ली ः पॅरिस सेंट-जर्मेन (पीएसजी) चा स्टार विंगर उस्माने डेम्बेले यांनी बॅलन डी’ओर जिंकून इतिहास रचला आहे. हा त्यांचा पहिलाच बॅलन डी’ओर आहे. पॅरिसमधील एका समारंभात त्यांना २०२५ चा बॅलन डी’ओर देण्यात आला. २८ वर्षीय फ्रेंच फुटबॉलपटूने बार्सिलोनाच्या लॅमिन यमल आणि त्यांचा क्लबमेट विटिन्हा यांना हरवून फुटबॉलचा सर्वात प्रतिष्ठित वैयक्तिक पुरस्कार पटकावला.
गेल्या हंगामात त्यांनी पीएसजीसाठी ५३ सामन्यांमध्ये ३५ गोल केले आणि १४ असिस्टही केले. या प्रभावी कामगिरीमुळे त्यांना बॅलन डी’ओर मिळाला. गेल्या अनेक वर्षांपासून दुखापती आणि सातत्याच्या अभावाशी झुंजत असल्याने डेम्बेलेसाठी हे यश अत्यंत खास आहे. तथापि, या हंगामात त्यांनी त्यांच्याकडून अपेक्षित असलेली सातत्य आणि दर्जा दाखवला आहे. पीएसजीच्या ऐतिहासिक युरोपियन विजयात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान लक्षात घेऊन त्यांना यापूर्वी चॅम्पियन्स लीग प्लेअर ऑफ द सीझन पुरस्कार मिळाला होता.
महिला गटात बोनमॅटीने रचला इतिहास
बार्सिलोनाची मिडफिल्डर एटाना बोनमॅटीने महिला गटात सलग तिसऱ्यांदा बॅलन डी’ओर जिंकून इतिहास रचला. बार्सिलोनाची युरोपियन मोहीम अपेक्षेनुसार झाली नसली तरीही, २६ वर्षीय स्पॅनिश स्टारने तिच्या चमकदार खेळाने आणि सातत्याने महिला फुटबॉलमध्ये आपले वर्चस्व कायम ठेवले.
जियानलुइगी डोनारुम्माने यशिन ट्रॉफी जिंकली
पॅरिसमधील थिएटर डू चॅटलेट येथे झालेल्या ६९ व्या बॅलन डी’ओर पुरस्कार समारंभात पीएसजीची गोलकीपर जियानलुइगी डोनारुम्माला यशिन ट्रॉफी (सर्वोत्तम गोलकीपर) देण्यात आली. बार्सिलोनाच्या विकी लोपेझला महिला कोपा अमेरिका ट्रॉफी देण्यात आली. महिला गटात इंग्लंडच्या व्यवस्थापक सरिना वेगमन आणि चेल्सीची गोलकीपर हन्ना हॅम्प्टन यांचाही समावेश होता. याशिवाय, पीएसजीला क्लब ऑफ द सीझन घोषित करण्यात आले.