
जळगाव ः जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत जैन स्पोर्ट्स, मॅप्स बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी आपला दबदबा कायम ठेवत घवघवीत यश संपादन केले.
जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित व जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडद्वारे प्रायोजित जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिपचे आयोजन जळगाव जिल्हा क्रीडा संघ येथील बॅडमिंटन हॉलमध्ये करण्यात आले होते. ही स्पर्धा जळगावचे वरिष्ठ खेळाडू अविनाश दामले यांच्या पुण्यतिथीच्या स्मरणार्थ घेण्यात आली. स्पर्धेमध्ये ११, १३, १५, १७, १९ वर्षाआतील वयोगटातील मुले व मुलींचे व ३५ प्लस, पुरुष व महिला एकूण १८४ खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.
या स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचे नाव राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर उंचावल्या बद्दल जळगाव बॅडमिंटन असोसिएशनच्यावतीने हेमराज लवांगे व ओवी पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे विजेता व उपविजेता खेळाडूंना जैन इरिगेशन सिस्टीम यांच्याकडून आकर्षक चषक, प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
या प्रसंगी जैन स्पोर्ट्स अकॅडमीची आंतरराष्ट्रीय कॅरमपटू आयशा खान, जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव विनीत जोशी, सदस्य शेखर जाखेटे, जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या बॅडमिंटन प्रशिक्षिका दीपिका ठाकूर उपस्थित होते. स्पर्धेसाठी प्रशिक्षिका दीपिका ठाकूर यांनी मुख्य पंच म्हणून तर जाजिब शेख, पुनम ठाकुर, मशरूक शेख, फाल्गुन पाटील, श्वेता धामके, तेजल भालेराव, शुभम चांदसरकर, कोनिका पाटील, ओवी पाटील, श्लोक जगताप यांनी पंच म्हणून काम पाहिले. प्रशिक्षक किशोर सिंह यांनी सूत्रसंचालन केले.
या स्पर्धेतील विजेते खेळाडूंना जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे क्रीडा समन्वयक अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी, प्रशिक्षक किशोर सिंह यांनी कौतुक केले आहे.