
मुंबई ः सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ-जेजे, आनंदराव अडसूळ चॅरीटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित माझी माऊली निवड चाचणी दक्षिण मुंबई विभागीय विनाशुल्क शालेय कॅरम स्पर्धेत सर्वेश परुळेकर, श्रेयस गायकवाड, आयुष पालकर, स्वरूप आंब्रे आदींनी सलामीचे सामने जिंकले.
उद्घाटनीय सामन्यात सर्वेश परुळेकरने विहान जाधवला ४ गुणांनी हरवून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त लीलाधर चव्हाण, मंडळाचे पदाधिकारी कृष्णा रेणुसे, भूषण परुळेकर, चंद्रकांत करंगुटकर, अनिल शेलार, अनिल नेवगी आदींच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले.
मुंबईत २४ ऑक्टोबरपासून होणाऱ्या कोकण कप विनाशुल्क शालेय कॅरम स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात प्रवेश मिळविण्यासाठी दैवत रंगमंच-भायखळा येथे सुरु झालेल्या विभागीय निवड चाचणी कॅरम स्पर्धेत शालेय ३२ खेळाडूंमध्ये चुरस आहे. श्रेयस गायकवाड विरुध्द आदित्य मालुसरे यामधील दुसरी लढत चुरशीची झाली. प्रारंभी आघाडी घेणाऱ्या आदित्य मालुसरेला मोक्याच्या क्षणी अचूक खेळ करीत श्रेयस गायकवाडने ८-५ असे चकविले. अन्य सामन्यात आयुष पालकरने चित्रांक वारेचा ११-० असा आणि स्वरूप आंब्रेने उत्कर्ष कनोजियाचा ६-३ असा पराभव करून पहिली फेरी जिंकली. पहिल्या आठ विजेत्या-उपविजेत्यांना आकर्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.