
- अन्य खेळांची मैदाने संबंधित जिल्हा क्रीडा संघटनेला द्यावेत
- सोलापूर शहर व जिल्हा क्रीडा फेडरेशनची पालिका आयुक्तांकडे मागणी
सोलापूर ः इंदिरा गांधी पार्क स्टेडियम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला देण्यास आमचा विरोध नाही. परंतु अन्य खेळाची मैदाने संबंधित जिल्हा संघटनेला द्या, अशी मागणी सोलापूर शहर व जिल्हा क्रीडा फेडरेशनने पालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांच्याकडे केली आहे.

या मागणीचे निवेदन मंगळवारी फेडरेशनचे पदाधिकारी आणि सर्व जिल्हा क्रीडा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने फेडरेशनचे अध्यक्ष महेश गादेकर यांनी दिले. यावेळी फेडरेशनचे उपाध्यक्ष झुबीन अमेरिया, राजीव देसाई, प्रिया पवार, सचिव डॉ किरण चौगुले, सहसचिव सुदेश मालप, चंद्रकांत रेम्बर्सो, अनिल पाटील, खजिनदार डॉ आनंद चव्हाण, सदस्य शफी शेख, झेड. एम. पुणेकर, संतोष खेंडे, दशरथ गुरव, मरगू जाधव, अजितकुमार संगवे, सत्येन जाधव, सुरेश खुर्द भोसले, पार्वतया श्रीराम, सुदेश देशमुख, प्रा शरणबसवेश्वर वांगी, सुनील चव्हाण, उमाकांत गायकवाड, मोहन रजपूत, राजाराम शितोळे, संतोष कदम, पुंडलिक कलखांबकर, शिवशंकर राठोड व सुवर्णा कांबळे आदी उपस्थित होते.
क्रिकेट संघटनेशी करार करा : आयुक्त
पार्क स्टेडियम व परिसर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला २९ वर्षांच्या करारावर देण्यात आले आहे आणि त्याचे हस्तांतरण देखील झाले आहे. क्रिकेट संघटना याची सर्व देखभाल करणार आहे. त्यामुळे क्रिकेट संघटनेकडून तुम्ही ही मैदाने घ्या, असे उत्तर आयुक्त डॉ ओंबासे यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना दिले.
यावर झालेल्या चर्चेनंतर कोण-कोणत्या खेळांची मैदाने तुम्ही घेणार आहात, त्याची देखभाल कोण करणार, आणि त्याचा मोबदला किती देणार हे दोन दिवसात आम्हाला लेखी द्या. त्यानुसार क्रिकेट संघटना व फेडरेशन यांच्यात एक बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
महापालिकेने आमच्याशी करार करावा : फेडरेशन
आयुक्तांच्या उत्तरावर फेडरेशनने तीव्र विरोध दर्शवला असून क्रिकेट संघटनेशी आम्ही करार करणार नाही, महापालिकेने आमच्याशी करार करावा. पार्क स्टेडियमवर खोखो, कबड्डी, व्हॉलीबॉल ही मैदाने तसेच टेबल टेनिस, जिम्नॅशियम हॉल व जलतरण तलावही स्मार्ट सिटीच्या निधीतून विकसित करण्यात आला आहे. तसेच तेथे तलवारबाजी, कराटे व शरीरसौष्ठव या खेळाडूंचाही सराव चालतो. त्यामुळे संबंधित संघटनेच्या संमतीशिवाय हा करार झालेला आहे. त्यामुळे ज्या खेळांच्या संघटना पालिकेची करार करण्यास तयार असतील त्या संघटनेची महापालिकेने करार करावा, अशी आग्रही मागणी यावेळी फेडरेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केली. महापालिकेने हा करार न केल्यास आंदोलन व कायदेशीर मार्गाने लढा उभारणार असल्याचे फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.