भारतीय संघाचा बांगलादेशशी सामना

  • By admin
  • September 23, 2025
  • 0
  • 10 Views
Spread the love

भारताला हरवण्याची क्षमता आहे – सिमन्स, कर्णधार लिटन दास जखमी 

दुबई ः आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाने सुपर फोरमध्ये पाकिस्तान संघाचा सहज पराभव करत अंतिम फेरी गाठण्याच्यादृष्टीने एक पाऊल पुढे टाकले आहे. बुधवारी भारतीय संघाचा सामना बांगलादेश संघाशी होणार आहे. सलग चार सामने जिंकलेला भारतीय संघ पाचवा विजय नोंदवण्यासाठी निश्चितच उत्सुक असेल. दुसरीकडे बांगलादेश संघाचे प्रशिक्षक फिल सिमन्स यांनी प्रत्येक संघात भारतीय संघाला हरवण्याची क्षमता आहे. आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न करू असे सिमन्स यांनी सांगितले .

आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाने सलग चार सामने जिंकून आपला दबदबा कायम ठेवला आहे. साहजिकच बांगलादेश संघाविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ विजयाचा प्रबळ दावेदार आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवचा फॉर्म हा एकमेव चिंतेचा विषय भारतासमोर आहे. आघाडीची फळी, संजू सॅमसन, तिलक वर्मा यांनी धमाकेदार फलंदाजी केली आहे. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह अद्याप अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकलेला नाही. ही फारच मोठी चिंतेची गोष्ट व्यवस्थापनासमोर आहे. 

भारतीय संघाविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी बांगलादेश संघाला वाढत्या तणावाचा सामना करावा लागत आहे. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी कर्णधार लिटन दासला दुखापत झाली होती. त्यामुळे तो भारताविरुद्ध खेळेल की नाही हे स्पष्ट नाही. बांगलादेशने यापूर्वी श्रीलंकेविरुद्ध आपला सामना खेळला होता, जिथे त्यांनी ४ विकेट्सने आरामात विजय मिळवला होता.

आयसीसी अकादमीमध्ये सराव करताना लिटन दासला पाठीचा त्रास जाणवला. लिटन नेटमध्ये सराव करत होता. त्याने स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या पाठीच्या डाव्या बाजूला अस्वस्थता जाणवली. टीम फिजिओ बायझिद उल इस्लाम यांनी त्याची तपासणी केली आणि तो सराव सत्रातच सोडून गेला. जर लिटन दास या सामन्यातून बाहेर पडला तर त्याच्या अनुपस्थितीत कोण कर्णधारपद भूषवेल? हे देखील स्पष्ट नाही. कारण बांगलादेशने या स्पर्धेसाठी उपकर्णधार नियुक्त केलेला नाही. सुपर ४ सामन्यापूर्वी, बांगलादेशने या स्पर्धेच्या गट टप्प्यात तीन सामने खेळले, त्यापैकी दोन जिंकले.

बांगलादेशचे प्रशिक्षक सिमन्स म्हणाले की, प्रत्येक संघात या भारतीय संघाला हरवण्याची क्षमता आहे. सामन्यापूर्वी काय घडले हे महत्त्वाचे नाही. बुधवारी काय होते यावर अवलंबून आहे. ते त्या साडेतीन तासांच्या खेळातील कामगिरीवर अवलंबून आहे. आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न करू आणि आशा करतो की भारताच्या कमकुवतपणा शोधू. अशा प्रकारे आम्ही सामने जिंकू.”

थेट प्रक्षेपण – रात्री ८ वाजेपासून. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *