
दुबई ः पाकिस्तान संघाने आशिया कप स्पर्धेत सुपर फोरमध्ये श्रीलंका संघावर पाच विकेट राखून सहज विजय नोंदवत आपले आव्हान कायम ठेवले. शाहीन आफ्रिदी व मोहम्मद नवाज यांच्या शानदार कामगिरीमुळे पाकिस्तानला पाच विकेट राखून विजय साकारता आला.
पाकिस्तान संघासमोर विजयासाठी १३४ धावांची आवश्यकता होती. साहिबजादा फरहान (२४), फखर झमान (१६७) या सलामी जोडीने ४५ धावांची भागीदारी केली. तीक्षणाने दोन विकेट घेऊन सामन्यात रंगत आणली.
सईम अयुब (२), सलमान आगा ( ५), हुसेन तलत (नाबाद ३२), मोहम्मद हरिस (१३), मोहम्मद नवाज (नाबाद ३८) यांनी संघाला पाच विकेटने विजय नोंदवून दिला. या विजयाने पाकिस्तानचे अंतिम फेरी गाठण्याची शक्यता वाढली आहे. वानिंदू हसरंगा (२-२७) व महेश तीक्षणा (२-२४) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
श्रीलंकेची फलंदाजी गडगडली
प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेने पाकिस्तानसमोर १३४ धावांचे लक्ष्य ठेवले. दोन्ही संघांसाठी हा सामना ‘करो या मर’ असा होता. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदी आणि हुसेन तलत यांनी घातक स्पेल टाकले आणि श्रीलंकेच्या फलंदाजीची फळी उध्वस्त केली. तथापि, कामिंदू मेंडिसच्या अर्धशतकाने त्यांना थोडी आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली.
कामिंडू मेंडिस याने सर्वाधिक ५० धावा काढल्या. त्याच्या अर्धशतकाचा अपवाद वगळता इतर फलंदाज स्वस्तात बाद झाले. कुसल परेरा (१५), असलंका (२०), हसरंगा (१५), करुणारत्ने (१७) यांनी धावांचा दुहेरी आकडा गाठला.
पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने सर्वाधिक ३ (३-२८) विकेट घेतल्या. हरिस रौफ आणि हुसेन तलतने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. अबरार अहमदने त्याच्या चार षटकांच्या स्पेलमध्ये फक्त आठ धावा देऊन एक विकेट घेतली.